Manipur violence | मणिपूर हिंसाचार प्रकरणी समिती स्थापन, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई- अमित शहा | पुढारी

Manipur violence | मणिपूर हिंसाचार प्रकरणी समिती स्थापन, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई- अमित शहा

पुढारी ऑनलाईन : गेल्या महिन्याभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराने (Manipur violence) थैमान घातले आहे. यामध्ये अनेक निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. याची केंद्र सरकारकडून दखल घेत, मणिपूर हिंसाचार घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. दरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.

याप्रकरणी केंद्राकडून गठीत करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष हे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असणार आहेत. तसेच यामध्ये मणिपूरचे राज्यपाल, शांतता समितीचे सदस्य आणि येथील समाजातील सदस्य यांचा समितीत समाविष्ट असणार आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पुढे बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, गेल्या 1 महिन्यात मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडल्या आहेत. हिंसाचारात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्व कुटुंबांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. मी गेल्या ३ दिवसांत मणिपूरमधील इंफाळ, मोरे आणि चुराचंदपूरसह अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. मी मेईतेई आणि कुकी समुदायांच्या नागरी संस्था संघटनेच्या प्रमुखांना देखील भेटलो असल्याचे अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितले.

Amit Shah : हिंसाचार पीडितांना मदत करण्यासाठी केंद्राकडून मोठी वैद्यकीय मदत

मणिपूर हिंसाचारातील मृतांच्या नातेवाईकांना मणिपूर सरकारकडून ५ लाख तसेच केंद्र सरकारकडून ५ लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे. राज्यातील हिंसाचार पीडितांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने मणिपूरला २० डॉक्टरांसह वैद्यकीय तज्ज्ञांची ८ पथके उपलब्ध करून दिली आहेत. यामधील ५ टीम यापूर्वीच पोहोचल्या असून इतर ३ लवकरच पोहचतील असे देखील शहा यांनी सांगितले.

‘हिंसाचार घटनांचा तपास पूर्णपणे निष्पक्ष होईल

मणिपूरमध्ये हिंसक घटनांचा तपास करण्यासाठी अनेक एजन्सी कार्यरत आहेत. हिंसाचारातील ६ घटनांची उच्चस्तरीय सीबीआय चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान लोकांना मदत करण्यासाठी आणि राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृह मंत्रालय आणि इतर मंत्रालयांचे सहसचिव आणि सहसंचालक स्तरावरील अधिकारी मणिपूरमध्ये उपस्थित राहतील. तसेच हा तपास पूर्णपणे निष्पक्ष होईल याची खात्री देखील अमित शहा यांनी दिली आहे.

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान शस्त्रे सापडल्यास कठोर कारवाई

मी मणिपूरच्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नये. सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (SoO) कराराचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शस्त्र बाळगणाऱ्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे. उद्यापासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू होईल आणि कोणाकडे शस्त्रे सापडली तर कठोर कारवाई केली जाईल, असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button