Latest

Nashik Crime : पोटच्या पोराला मारण्यासाठी बापानेच दिली सुपारी, तिघांनी मिळून काटा काढला

गणेश सोनवणे

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; दारू पिऊन नशेतच वारंवार आई-वडील व कुटुंबियांना त्रास देणार्‍या पोटच्या पोराचा वडिलांनी घात केल्याची घटना बुधवारी (दि.27) उघडकीस आली. मुलाला मारण्यासाठी त्यांनी दोघा स्थानिकांना सुमारे 70 हजारांची सुपारी दिली होती. जन्मदात्यानेच मुलाचा खून केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ( Nashik Crime)

राहुल शिवाजी आव्हाड (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. पास्ते – हरसुले रस्त्यावर बुधवारी (दि.27) दुपारच्या सुमारास बंदावस्थेत असलेल्या कालिया कंपनीच्या आवारातील मीटर रूममध्ये राहुलचा मृतदेह आढळून आला. परिसरातील शंकर कातकाडे यांनी बघितल्यानंतर तत्काळ याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी राहुलच्या तोंडातून फेस येत होता. नागरिकांच्या मदतीने राहुलला तत्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. (Nashik Crime)

मात्र, राहुलने आत्महत्या केली की खून याबाबत खुलासा होत नसल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले. राहुलच्या शवविच्छेदनाच्या अहवालात राहुलचा गळा दाबून खून झाल्याचे समोर आले. त्यांनतर त्याच्या तोंडात विषारी औषधही टाकण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी राहुलच्या कुटुंबातील सदस्यांसह ग्रामस्थांकडे चौकशी केली. यावेळी पोलिसांना राहुल हा दारुच्या आहारी गेला होता व तो आपल्या आई-वडिलांना मारहाण करीत असल्याचे तपासात पुढे आले. एवढेच नव्हे तर तो गावातील नागरिकांनाही त्रास देत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय कुटुंबातील सदस्यांवर बळावला. त्यानंतर खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी राहुलचे वडील शिवाजी आव्हाड, वसंत आव्हाड व विकास कुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कोठाळे पुढील तपास करत आहेत.

संशयित आरोपींना 5 दिवसांची पोलिस कोठडी
राहुलचे वडील शिवाजी विश्वनाथ आव्हाड (50) यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या मुलाला मारण्यासाठी गावातील वसंत अंबादास आव्हाड (40) व विकास उर्फ बबलू शिवाजी कुटे (43) या दोघांना 70 हजार रुपये देण्याचे कबूल करत सुपारी दिल्याचे सांगितले. त्यांनतर वसंत व विकास या दोघांनी रात्रीच्यावेळी राहुलला एकांतात गाठत हरसूले रस्त्यावरील बंद पडलेल्या कंपनीत घेऊन गेले. तेथे त्यांनी राहुलचा गळा दाबून खून केला. राहुलने स्वतःच विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली असे भासविण्यासाठी तोंडात विषारी औषध टाकले. याबाबत दोघा संशयितांनी कबूली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तिघांना अटक करुन न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस म्हणाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT