Latest

सोलापुरात उभारणार देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प; पहिल्या टप्प्यातील घरांचे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण

backup backup

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  असंघटित क्षेत्रातील विणकर व यंत्रमाग, बिडी कामगार, घरगुती कामगार, मोटार गॅरेज , दुकानांमध्ये काम करणारे, फळ आणि फुल विक्रेते, घड्याळ तसेच चष्मे दुरुस्ती करणाऱ्या लहान कारागीरांसाठी सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथे सुमारे ३० हजार घरांचा प्रकल्प उभा रहात आहे. देशातील हा सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील घराचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे.

गृहनिर्माण विभागाचे उपसचिव अजित कवडे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हा सर्वात मोठा गृहप्रकल्प आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील रे नगरमध्ये येथे हा प्रकल्प सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारने २०१६ मध्ये मान्यता दिलेल्या या महत्वकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी २०१९ मध्ये करण्यात आले होते.

तळमजला आणि दोन मजले असे प्रत्येक या प्रकल्पाचे स्वरूप असून एकूण ८३३ इमारती उभ्या केल्या जात आहेत. या ८३३ इमारतींच्या माध्यमातून सुमारे ३० हजार घरकुलांची निर्मिती होत आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च १८११.३३ कोटी रुपये इतका असून त्यापैकी राज्य शासनाने आपला हिस्सा ३०० कोटी रुपये आणि केंद्र शासनाने आपला हिस्सा ४५० कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे.

केंद्र शासनाने सदर प्रकल्पासाठी मंजूर केलेल्या निधी अंतर्गत आतापर्यंत २६१.१४४ कोटी रुपये आणि राज्य शासनाने २०२.४४ कोटी असा एकूण ४६३.५८४ कोटी इतका निधी वितरित केला आहे. सदर प्रकल्प हा दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असून यापैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले आहे. पहिल्या टप्प्यातील घरांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये पाणी, रस्ते, वीज आणि मलनिस्सारण या सुविधाना प्राधान्य देण्यात आले आहे. ही कामे पूर्ण होताच पहिल्या टप्प्यातील घरांचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहितीही कवडे यांनी दिली.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT