Latest

कोल्हापूर: वाघबीळ घाटातील दरीत कार कोसळली; हुबळीतील ४ जण गंभीर जखमी

अविनाश सुतार

पन्हाळा: पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ घाटात नागमोडी वळणावर आज (दि.७) पहाटे भरधाव कार २०० फूट दरीत कोसळली. या अपघातात चौघे जण गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेची लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. इम्रान मुस्तफा मुंडके (वय ३९) महंमदआली नूरमहंमहद बिजापूर (वय २२) इम्रान शरीफ बागवान (वय२४) शाकिर मुन्ना कितुर (वय २०) अशी जखमींची नावे आहेत. ते सर्वजण हुबळी (ता. धारवाड) येथील रहिवाशी आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्वजण शनिवारी (दि.६) रात्री (KA63 M 9568) कारमधून विशाळगडहून हुबळी धारवाडकडे निघाले होते. आज पहाटेच्या दरम्यान, वाघबीळ घाटातील एका नागमोडी वळणावरील संरक्षक काठड्यावरून कार दरीत कोसळली. त्यानंतर कारमधील सर्वजण जखमी अवस्थेत झाडा-झुडपांचा आधार घेऊन रस्त्यावर आले. एका खासगी रुग्णवाहिकेतून ते सर्व जण खासगी रुग्णालयात दाखल झाले.

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते पंडित नलवडे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी कुणी नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती कोडोली व महामार्ग पोलिसांना दिली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

दरम्यान, दरीत कोसळलेल्या कारचा टायर फुटला आहे. त्यामुळे टायर फुटून हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी दिवसभर नागरिकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT