पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे आजपासून (दि.२) भाजपच्या कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक (BJP National executive meeting) होत आहे. तर दुसरीकडे हैदराबाद येथे सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हैदराबादमध्ये आज दोन मोठी शक्तिप्रदर्शने पाहायला मिळणार आहे.
भाजपची कार्यकारिणीची बैठक (BJP National executive meeting) आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवर पोस्टर वॉर सुरू झाले आहे. भाजपने केंद्राच्या यशाचे चित्रण करणारे कटआउट आणि बॅनर लावले आहेत, तर टीआरएसने केसीआर आणि यशवंत सिन्हा यांचे पोस्टर लावले आहेत.
दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पाच वर्षांनंतर राजधानीबाहेर होत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, १९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर भाजपचे वरिष्ठ नेते पक्षाच्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर रविवारी दुपारी हैदराबाद येथील परेड ग्राउंडवर पंतप्रधान जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तर पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर विमानतळावर जाणार नाहीत.
सहा महिन्यांतील ही तिसरी वेळ आहे की राव यांनी भेट देणाऱ्या पंतप्रधानांच्या स्वागताचा प्रोटोकॉल पाळलेला नाही. मे महिन्याच्या सुरुवातीला राव बंगळुरूला गेले होते. जेव्हा पंतप्रधान मोदी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या २० व्या वार्षिक समारंभात सहभागी होण्यासाठी हैदराबादला गेले होते. फेब्रुवारीमध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'च्या उद्घाटनासाठी हैदराबादला गेले होते, तेव्हाही राव यांनी पंतप्रधानांना भेटण्याचे टाळले होते.
भाजपच्या या बैठकीत पुढील राजकीय धोरण आणि रणनीती, आर्थिक प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुक्रवारी रोडशो केला. यापूर्वी, भाजपने तेलंगणातील ११९ विधानसभा मतदारसंघात ११९ बड्या नेत्यांना उमेदवारी दिली होती.
हेही वाचलंत का ?