पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र असल्यामुळे तेजस्वी यादव बिहारचे उपमुख्यंत्री आहेत. अन्यथा गुणवत्तेच्या आधाराचा विचार झाला असता तर त्यांना कोणतीही नोकरी मिळाली नसती. आजही ते बेरोजगारच राहिले असते, अशा शब्दात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर ( Prashant Kishor ) यांनी तेजस्वी यादव यांची खिल्ली उडवली.
प्रशांत किशोर सध्या साडेतीन हजार किलोमीटर 'जन सूरज' पदयात्रेत सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी बिहारचे
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलावर ( आरजेडी)सडकून टीका केली. ते म्हणाले, नितीशकुमार आणि
राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांना स्वत:चे स्थान नाही. हे लोक अन्य कोणालाह[ पंतप्रधान कशी बनवतील, असा सवाल त्यांनी केला. नितीश कुमार हे भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी सरसावले आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) ने आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवरून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीतून बाहेर पडले होते. आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही अवस्था चंद्राबाबू नायडू यांच्या सारखी होईल, असे भाकीतही त्यांनी केले.
भाजपने बिहारचे भविष्य नितीश कुमारांना विकले आहे. या पक्षाची बिहारमधील स्थिती खूपच बिकट झाली आहे, असा दावाही त्यांनी केला. २०१८ मध्ये प्रशांत किशोर हे नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षात सहभागी झाले होते. मात्र यानंतर त्यांचे विविध मुद्यांवर मुख्यमंत्री नितीश कुमारांशी मतभेद झाले. त्यांनी २०२० मध्ये जनता दल (संयुक्त) पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून ते नितीशकुमारवर मोठ्या प्रमाणावर टीका करतात.
हेही वाचा :