Latest

तहसीलदार लाच घेतो, ही शरमेची बाब ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची खंत

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  लाच घेण्याचे प्रमाण वाढले असून, महसूल सप्ताह सुरू असताना एक तहसीलदार लाच घेतो, ही शरमेची बाब आहे. लाच घेताना पकडलो गेलो, याची भीती वा कोणते सोयरसुतकच या अधिकारी व कर्मचार्‍यांना वाटत नाही. तीन-चार महिन्यांत पुन्हा कामावर रुजू होतात. लाच घेतल्यानंतर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कारवाईच्या नियमात बदल करावा लागेल, अशी गरज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. विखे पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) विठ्ठल लंघे आदी उपस्थित होते.

राज्यभरात 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. त्यात गोरगरीब जनतेला शासकीय योजनांचा लाभ देण्याचे काम सुरू होते. अशा परिस्थितीत नाशिक येथील एक तहसीलदार लाचेच्या जाळ्यात सापडला. याकडे विखे पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले. महसूल सप्ताहात तहसीलदाराचे हे कृत्य अतिशय शरमेची बाब आहे. अधिकारी व कर्मचारी लाच घेतात. पकडल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा कामावर रुजू होतात. केलेल्या कृत्याचे त्यांना सोयरसुतक नसते. अशा अधिकारी व कर्मचार्‍यांवर कडक कारवाई आवश्यक आहे. त्यासाठी नियमात बदल करावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून नियमात बदल करावा लागेल. तरच या भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे विखे यांनी नमूद केले.

महापुरुषांबाबत गरळ ओकण्याचे प्रकार सुरू आहेत. शासनाने प्रत्येक घटनेची दखल घेतली आहे. कारवाई सुरू आहे. कोणाला पाठीशी घातले जाणार नाही. संभाजी भिडेंबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळे याबाबत मी बोलणार नाही, असे विखे यांनी सांगितले.

खर्चापेक्षा जनतेला लाभ महत्त्वाचा
जिल्ह्यातील 30 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डीत 11 ऑगस्टला कार्यक्रम होत आहे. लाभार्थ्यांना ने आण करण्यासाठी सहाशे बसची व्यवस्था केली आहे. हा कार्यक्रम नगर येथे घेण्याचे नियोजन होते. परंतु पाऊस आणि हवामान बदलाचा विचार करून शिर्डीला कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमाला किती खर्च येणार हे महत्त्वाचे नाही, तर गोरगरीब जनतेला लाभ मिळावा हा उद्देश असल्याचे महसूलमंत्री विखे यांनी सांगितले.

…तर पोलिस अधिकार्‍यांवर राज्यस्तरावरून कारवाई
नगर शहर आणि जिल्हाभरात गुन्हेगारीच्या काही घटनांबाबत पोलिस प्रशासनाकडून 'मोक्का'सह इतर कारवाया सुरू आहेत. अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटनांना जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी त्याला यश आले नाही. आगामी काळात कामात कसूर करणार्‍या पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी लवकरच पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेऊन निर्देश दिले जातीत. त्यानंतरही कामकाजात सुधारणा न झाल्यास राज्यस्तरावरून त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा विखे पाटील यांनी दिला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT