खरवंडी कासार(अहमदनगर); पुढारी वृतसेवा : हनुमाननगर (भारजवाडी, ता. पाथर्डी) येथील ऊसतोड कामगारांची वस्ती असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक लहू बोराटे व सहशिक्षक राघू जपकर यांची प्रशासकीय बदली झाली आणि या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांसोबत सारेच पालक अक्षरशः ढसढसा रडले. या वस्तीवरील शाळेतील नव्या शिक्षकांच्या स्वागताचा व बदली झालेल्या शिक्षकांना निरोपाचा कार्यक्रम सरपंच माणिक बटुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आयुक्त दिलीप खेडकर, माजी पंचायत समिती सदस्य सुनील खेडकर आदींच्या उपस्थितीत नुकताच झाला. मुलगी सासरी जाताना ज्या जड अंतःकरणाने निरोप समारंभ होतो, त्याच पद्धतीचेे भावनिक वातावरण तेथे तयार झाले होते. या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या अश्रूंचा फुटलेला बांध या शिक्षकांच्या कार्याची ओळख करून देत होता.
ओसाड माळरानावर ऊसतोड मजुरांच्या वस्तीवरील या बंद पडलेल्या शाळेवर लहू बोराटे व राघू जपकर यांची नियुक्ती झाली होती. फळा व खुर्ची नसणारी ती शाळा आज आदर्श शाळा म्हणून नावारूपाला आली आहे. या शाळेतील उपक्रमांना आणि गुणवत्तेत झळकलेल्या विद्यार्थांना विविध पुरस्कार मिळाले ते या शिक्षकांच्या कामामुळेच.
त्यांनी पालकांमध्ये शिक्षणाप्रती जागरूकता निर्माण केली. आपल्या मुलांच्या हातातील कोयता जाऊन पेन यावे, तेही साहेब व्हावेत, ही आशा निर्माण करून त्याच मजुरांच्या आर्थिक सहभागातून शाळा डिजीटल केली. लोकसहभाग आणि प्रसंगी स्वतः खर्च करत शाळेचा कायापालट केला. शाळा अत्याधुनिक झाली. हे करत असताना मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही भर दिला. त्यामुळे मुले जिल्हास्तरावर चमकली. बंद पडलेली शाळा काही दिवसांतच आदर्श शाळा झाली. या शाळेत प्रवेशासाठी इतर गावांतील विद्यार्थीही येऊ लागले.
या शाळेतील विद्यार्थी आजी-आजोबासोबत राहतात. त्यांचे आई-वडील ऊसतोडणीसाठी सहा महिने बाहेर असतात. त्यामुळे मुलांच्या निर्माण होणार्या अनेक अडचणी बोराट आणि जपकर यांनीच सोडवल्या. विद्यार्थी बँकसारखा उपक्रम सुरू करून, तेच जणू या विद्यार्थ्यांचे पालकही झाले. स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी चमकले. काही जवाहर नवोदय विद्यालयात गेले. सारेच शिस्तीचे भोक्ते झाले. कोरोना काळातील या शाळेचा सुंदर हस्ताक्षर हा उपक्रम राज्यभर गाजला. अशा रितीने ऊसतोडणी मजुरांच्या मुलांच्या आयुष्याचे सोने करणार्या या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थी, त्यांचे पालक रहिवासी ढसढसा रडू लागले.
या निरोप समारंभात चिमुकली विद्यार्थिनी प्रतीक्षा मल्हारी बटुळे हिने कविता सादर केली.. 'या शाळेतून जाताना, दगडालाही पाझर फुटेल, निरोप आपणाला देताना..' ही कविता सादर करताना ती रडू लागली आणि सारे भावनाविवश झाले. ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा