चंद्रपूर (पुढारी वृत्तसेवा) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी प्रादेशिक वनविभागात सुरू करण्यात आलेली व्याघ्र सफारीला ब्रेक लागला आहे. विशेष म्हणजे प्रादेशिक वनविभागात केला जाणारा हा देशातील एकमेव प्रयोग होता. मात्र, ही सफारी सध्या थंडबस्त्यात गेली आहे. चार पैकी केवळ एकच ठिकाणी ही सफारी सुरू असून त्याला देखील थंड प्रतिसाद मिळत आहे. प्रादेशिक वनविभागतील ही सफारी रस्त्यांच्या दुर्दशेमुळे बंद झाली आहे. यावर्षी आलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, त्यांची अद्याप डागडुजी करण्यात आलेली नाही. त्याचा परिणाम थेट पर्यटकांवर झाला आहे. पर्यटन आणि महसूल (Tadoba-Andhari National Park ) अशा उदेश्याने सुरू झालेली सफारी नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
हमखास वाघांच्या दर्शनाकरीता ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच जगभरातील पर्यटकांचा ओघ ताडोबाच्या दिशेने असतो. त्यामुळेच ताडोबाची बुकिंग ही नेहमी हाऊसफुल असते. ताडोबाची एक बुकिंग करण्यासाठी महिनोमहिने पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागते. शिवाय ही सफारी खर्चिक असल्याने सामान्य नागरिकांना परवडण्यासारखी नाही. शिवाय जितके वाघ हे ताडोबा प्रकल्पात आहे तेवढेच वाघ त्याच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात आहे.
त्यामुळे ताडोबाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा, पर्यटकांना सुविधा व्हावी या उद्देशाने प्रादेशिक वनविभागाकडून 26 जानेवारी 2021 ला तत्कालीन मुख्य वनसंरक्षक एन. प्रवीण यांच्या हस्ते कारवा-बल्लारपूर सफारी सुरू करण्यात आली. त्यानंतर चोरा-तिरवंजा, जोगापूर आणि पोंभुरणा या ठिकाणी या ठिकाणी टप्याटप्याने ही सफारी सुरू झाली. पर्यटकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवसापासूनच या सफारीत वाघांचे दर्शन पर्यटकांना व्हायला लागले. सोबत स्थानिकांना प्रशिक्षण देऊन गाईड उपलब्ध् झाल्याने रोजगाराला चालना मिळाली.
दरवर्षी पावसात कच्चे रस्ते वाहून जातात किंवा खराब होतात. त्यामुळे पावसाळा गेल्यानंतर रस्त्याची डागडुजी केली जाते. या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. अनेक रस्ते वाहून गेले, खराब झाले. पाऊस गेल्यानंतर वनविभागाने या रस्त्यांची डागडुजी केली नाही. त्याचा परिणाम प्रादेशिक वनविभागातील सफारी वर झाला. चार पैकी तीन सफारी रस्त्यांच्या दुर्दशेने बंद पडल्या आहेत. सध्या एक सुरू आहे. त्या सफारीवरही परिणाम झाला आहे. या ठिकाणी पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. सध्या जी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्या रस्त्याने वाहने चालू शकत नाही. त्यामुळे तीन सफारी आता बंद झाल्या आहेत. तर चौथीही बंद होण्याच्या मार्गावर आहे.
Tadoba-Andhari National Park :वनविभागाचे दुर्लक्ष आणि डागडुजीची प्रतीक्षा
प्रादेशिक सफारीची स्पर्धा ही ताडोबाशी व्हायला हवी तरच या सफारीचे महत्व आणि अर्थकारणाला चालना मिळेल. दरवर्षी 1 ऑक्टोबरला ताडोबाची सफारी सुरू होते. त्याच काळात प्रादेशिक वनविभागाची सफारी सुरू होणे आवश्यक आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत ताडोबातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. याच धर्तीवर प्रादेशिक वनविभागाच्या रस्त्यांचीही दुरुस्ती होणे अपेक्षित आहे. मात्र, दोन महिने उलटूनही तीन सफारीच्या ठिकाणी रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. यामध्ये कारवा-बल्लारपूर, जोगापूर आणि पोंभूर्णा या सफारीचा समावेश आहे. तर चोरा-तिरवंजा या ठिकाणी रस्त्याची डागडुजी करून 2 डिसेंबरपासून सफारी सुरू करण्यात आली. मात्र आत्तापर्यंत केवळ 13 वाहनेच या रस्त्याने सफारी करू शकले आहे. वनविभागाने वेळीच लक्ष दिले असते तर सर्व सफारी सुरू राहून महसूल आणि स्थानिकांचा रोजगार सुरू राहिला असता, अशी तक्रार स्थानिकांमधून येत आहे.
यंदा चंद्रपूर जिल्ह्यात खास करून जंगलपरिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जंगलातील अनेक रस्ते वाहून गेलेत. त्यामुळे गस्त घालणे कठीण झाले आहे. रस्ते दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव वरीष्ठ विभागाकडे पाठविण्यात आला आहे, तो मंजूर होताच रस्ते दुरुस्तीची कामे सुरू होतील, आणि बंद झालेल्या सफारी पूर्ववत होतील, प्रतिक्रिया कारवा-बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिली आहे.
हेही वाचा