पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या पराभवानंतर संघाचा कर्णधार केएल राहुलवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आणि रस्सी वॅन डेर डुसेन यांच्यात 204 धावांची भागिदारी होताना भारताचा कर्णधार राहुल (KL Rahul)चे डोकेच चालणे बंद झाले होते काय? त्याला रणनितीत बदल करण्याच्या आयडिया सूत नव्हत्या का? असा खरमरीत सवाल उपस्थित केला आहे. बुधवारी (दि. 19) पर्ल येथे झालेल्या पहिल्या वनडेत टीम इंडियाला द. आफ्रिकेकडून 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या विजयासह यजमान संघ मालिकेत 1-0 ने पुढे गेला आहे.
केएल राहुल हा सध्या टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार आहे. पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा जखमी असल्याने तो या मालिकेत खेळत नाहीय. त्यामुळे निवड समितीने राहुलची नेतृत्वाखाली संघ पहिली वनडे सीरिज खेळत आहे. त्यातील पहिला सामना टीम इंडियाला गमवावा लागला आहे. या पराभवानंतर केएल राहुलच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. याला कारणही तसेच आहे. चला तर त्याची चर्चा करूया.
पहिल्या वनडेत एक वेळ अशी आली होती की, प्रथम फलंदाजी करणा-या द. आफ्रिका संघाची धावसंख्या 3 बाद 68 होती. पण, त्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा आणि रस्सी व्हॅन डर डुसेन या जोडीने चौथ्या विकेटसाठी 204 धावांची विक्रमी भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारतीय संघाला 297 धावांचे लक्ष्य मिळाले. या भक्कम भागीदारीमुळे आफ्रिकेने अखेरच्या पाच षटकांत भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली होती. बावुमा आणि डुसेन यांनी झुंझार खेळीचे प्रदर्शन करून शतक झळकावले. बावुमा 110 धावांवर बाद झाला. तर डुसेन 129 धावा करून नाबाद राहिला. दोघांच्यात झालेली विक्रमी भागिदारी हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला, असे अनेकांचे म्हणणे आहे.
एका वाहिनीशी बोलताना सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले की, 'बावुमा-डुसेन जोडीने संयमाने संघाचा डाव सावरत एका मोठ्या लक्ष्या पर्यंत मजल मारली. त्यांच्या खेळी कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पण दुसरीकडे भारताचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) त्या दोघांना बाद करण्यासाठी खास रणनिती बनवण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसले. असं वाटले की, राहुल जवळ्याच्या सगळ्या आयडियाच संपल्या आहेत. पहिल्या वनडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली अनुकुल होती. चेंडू थेट बॅटवर येत होता. त्यावेळी केएल राहुलला काय करावे हे समजत नव्हते. असं वाटतं होतं की त्याचं डोकं चालतच नाहीय.'