Latest

Stock Market Closing | शेअर बाजारावर अस्थिरतेचे सावट! ‘या’ स्टॉक्सना फटका, जाणून घ्या यामागील कारण?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजावर दबाव निर्माण झाला. यामुळे बाजाराने एका मर्यादेच्या आतच व्यवहार केला. त्यात कर्पोरेट कंपन्यांच्या कमकुवत उलाढालीमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार सपाट झाला. आज सेन्सेक्सने १०० अंकांच्या वाढीसह ५९,६०० वर सुरुवात केली होती. तर निफ्टी १७,६५० च्या वर होता. पण काही वेळातच दोन्ही निर्देशांक सपाट झाले. सेन्सेक्स २२ अंकांच्या किरकोळ वाढीसह ५९,६५५ वर बंद झाला. तर निफ्टी १७,६२४ वर स्थिरावला. (Stock Market Closing)

'हे' होते टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

रियल्टी, ऑटो, मेटल स्टॉक्सवर दबाव राहिला आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात टेक महिंद्रा आणि टाटा स्टील टॉप लूजर होते. आजच्या ट्रेडिंगमध्ये बाजारात काही प्रमाणात विक्री दिसून आली. बीएसई सेन्सेक्सवर आयटीसी, टीसीएस, विप्रो, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, एचडीएफसी, कोटक बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स यांनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला. निफ्टीवर टीसीएस, आयटीसी, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, विप्रो आणि एशियन पेंट्स हे शेअर्स वधारले होते, तर एचडीएफसी लाइफ, टेक महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेस, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज हे लूजर्स होते.

बँकिंग स्टॉक्समध्ये घसरण

Nifty PSU Bank सुमारे १ टक्के घसरला. बँकिंग स्टॉक्समध्ये इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब अँड सिंध बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र हे शेअर्स घसरले होते.

ऑटो स्टॉक्सवर आज दबाव दिसून आला. टीव्हीएस मोटर्स, अशोक लेलँड, मारुती सुझुकी, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स हे टॉप लूजर्स होते. (Stock Market Closing)

व्होडाफोन आयडियाचे शेअर्स १० टक्क्यांनी वाढले, 'हे' ठरले कारण

व्होडाफोन आयडियाचे (Vodafone Idea) शेअर्स आज सुमारे १० टक्क्यांनी वाढले. कंपनीने कुमार मंगलम बिर्ला यांची २० एप्रिल पासून अतिरिक्त संचालक (Non-Executive and Non-Independent) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केल्यानंतर शुक्रवारच्या व्यवहारात व्होडाफोन आयडियाचे शेअर्स वधारले.

भारतीय बाजारात FPIs चा ओघ वाढला

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार म्हणजेच एफपीआयकडून नवीन आर्थिक वर्षात भारतीय बाजारात खरेदीचा ओघ वाढला आहे. एफपीआयनी एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात ८,७६७ कोटी (१.०७ अब्ज डॉलर) रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे. FPIs ने गेल्या आर्थिक वर्षात ३७,६३२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली होती. आता ते निव्वळ खरेदीदार बनले असल्याचे NSDL आकडेवारीवरुन दिसून आले आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत घट

अमेरिकेतील संभाव्य मंदीच्या पाश्वभूमीवर मागणी घटणार असल्याच्या शक्यतेने कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरत प्रति बॅरेल २ डॉलरने घट झाली आहे. कालच्या व्यवहारात ब्रेंट क्रूड फ्यूचर्स प्रति बॅरेल २.०२ डॉलर म्हणजे २.४ टक्क्यांनी कमी होऊन प्रति बॅरेल ८१.१० डॉलरवर आले. दरम्यान, मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरवाढीचा सपाटा आणि अमेरिकेतील संभाव्य मंदीच्या संकेतांमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहे. यामुळे जगभरातील बाजारांत अस्थिरता दिसून येत आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT