Stock Market Closing : जागतिक सकारात्मक संकेतांच्या जोरावर आज शुक्रवारी (दि. २४) सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ५९,८०० वर होता. तर निफ्टी १७,५०० वर होता. दुपारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी तेजी गमावली आणि ते घसरले. त्यानंतर सेन्सेक्स १४१ अंकांनी घसरून ५९,४६३ वर बंद झाला. तर निफ्टी ४५ अंकांनी खाली येऊन १७,४६५ वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात रिलायन्स, बँकिंग आणि आयटी स्टॉक्सनी आघाडी घेतली. तर मेटल, ऑटो स्टॉक्समध्ये दबाव दिसून आला. सेन्सेक्स घसरणीमुळे सलग सहाव्या सत्रात गुंतवणूकदारांना फटका बसला आहे.
आजच्या व्यवहारात बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, टायटन, विप्रो, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक हे शेअर्स वाढले. तर आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा, कोटक महिंद्रा, आयटीसी, टीसीएस, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, मारुती, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एम अँड एम या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. निफ्टी PSU बँक ०.८९ टक्के आणि निफ्टी आयटी ०.७१ टक्क्याने वाढला. फायनान्सियल सर्व्हिसेस आणि निफ्टी आयटी यांनीदेखील वाढून व्यवहार केला. (Stock Market Closing)
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने अवघ्या एका महिन्यात अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला १२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अदानी समूहाचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्च पातळीपासून ८४ पर्यंत घसरले आहेत. यामुळे सर्व १० अदानी शेअर्सचे एकूण बाजार भांडवल एका महिन्यात ६२ टक्क्यांने कमी होऊन ७.३२ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. गौतम अदानी हे जगातील श्रीमंताच्या यादीत तिसऱ्या स्थानी होते. पण २५ जानेवारी रोजी अदानी विरोधातील हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाला. त्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले. त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अदानी आता श्रीमंतांच्या यादीत २९ व्या स्थानावर गेले आहेत.
अदानी ग्रीन एनर्जी या शेअर्सची सर्वात खराब कामगिरी राहिली आहे. त्याने ५२ आठवड्यांच्या उच्च पातळीपासून ८४ टक्के बाजार मूल्य गमावले आहे. हा शेअर्सला आज ५ टक्के लोअर सर्किट लागले.
अमेरिकेच्या शेअर बाजारातील वाढीचा मागोवा घेत आशियाई बाजारात सकारात्मक वातावरण राहिले. टोकियोतील निर्देशांक शुक्रवारी उच्च पातळीवर बंद झाले. निक्केई २२५ निर्देशांक १.२९ टक्के म्हणजेच ३४९.१६ अंकांनी वाढून २७,४५३.४८ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक ०.६७ टक्के म्हणजेच १३.१५ अंकांनी वाढून १,९८८.४० वर पोहोचला.
हे ही वाचा :