Latest

Stock Market Closing Bell | ६ सत्रांतील घसरणीनंतर ‘सेन्सेक्स’चा यू-टर्न, ‘या’ घटकांमुळे परतली तेजी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : गेल्या सहा सत्रांतील घसरणीनंतर आज शुक्रवारी (दि. २७) शेअर बाजारात तेजी परतली. जागतिक बाजारातील परिस्थितीत सुधारणा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीने आज यू-टर्न घेतला. आज सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून आली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढून ६३,८५० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक १९ हजारांवर राहिला. त्यानंतर सेन्सेक्स ६३४ अंकांच्या वाढीसह ६३,७६२ वर बंद झाला. तर निफ्टी १९० अंकांनी वाढून १९,०४७ वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यानी वाढले. पीएसयू बँक निर्देशांक ४ टक्क्यांनी वाढला. तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्ह्यात बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी जवळपास २ टक्क्यांनी वाढले.

संबंधित बातम्या 

काल सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरून ६३,१४८ वर बंद झाला होता. आज तो ६३,५५९ वर खुला झाला. त्यानंतर तो ६३,९१३ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर ॲक्सिस बँक आणि एचसीएल टेक हे शेअर टॉप गेनर्स ठरले. ॲक्सिस बँकेचा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वाढून १,००३ रुपयांवर पोहोचला. एचसीएल टेकचा शेअरही ३ टक्के वाढून १,२६८ रुपयांवर गेला. एसबीआय, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, एनटीपीसी, रिलायन्स, इंडसइंड बँक, इन्फोसिस, मारुती, बजाज फायनान्स, एलटी, विप्रो, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते २.५० टक्क्यांदरम्यान वाढले.

व्होडाफोन आयडियाचे शेअर्स वधारले

दरम्यान, व्होडाफोन आयडियाचे (Vodafone Idea) शेअर्स आज सुमारे ३ टक्क्यांनी वाढले. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढला असतानाही व्होडाफोन आयडियाचे शेअर्स वधारले हे विशेष!. दरम्यान, Vodafone Idea 5G नेटवर्क आणण्यासाठी आणि भारतात 4G कव्हरेजचा आणखी विस्तार करण्यासाठी गुंतवणुकीला चालना देईल, असे कंपनीचे अतिरिक्त संचालक कुमार मंगलम बिर्ला यांनी २७ ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसच्या ७ व्या आवृत्तीत सांगितले होते.

जागतिक बाजार

अमेरिकेतील बाजारातील मजबूत संकेतांचा मागोवा घेत आज आशियाई बाजारात तेजी परतली. जपानचा निक्केई निर्देशांक आज सुमारे १ टक्क्याने वाढला. चीनचा ब्लू चीप्स सपाट झाला. तर तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक १ टक्के वाढला. शांघाय, सिंगापूर, सिडनी, सेऊल, जकार्ता आणि तैपेई या सर्व शेअर बाजारांमध्ये तेजी होती. ॲमेझॉन आणि इंटेल सारख्या टेक दिग्गज कंपन्यांच्या धमाकेदार कमाईमुळे आशियाई बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. यामुळे आशियाई बाजारातील निर्देशांक वधारले. अमेरिकेचे १० वर्षीय रोखे उत्पन्नात घट झाल्यामुळेही बाजारात तेजीचा माहौल दिसून आला.

कच्च्या तेलाचे दर

अमेरिकेच्या सैन्याने सीरियातील इराणी लक्ष्यांवर हल्ला केल्याच्या वृत्तामुळे तेलाच्या किमती आज शुक्रवारी सुमारे १ डॉलरने वाढल्या. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इस्रायल-हमास संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिंता निर्माण झाली आहे; ज्यामुळे मध्य पूर्व उत्पादक प्रदेशातील पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

परदेशी गुंतवणूकदार

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी ७,७०३ कोटींच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ६,५५८ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT