पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. आज बुधवारी (दि.८) सलग चौथ्या दिवशी किरकोळ घसरण झाली. सेन्सेक्स ४५ अंकाच्या घसरणीसह ७३,४६६ वर बंद झाला. तर निफ्टी २२,३०२ च्या सपाट पातळीवर स्थिरावला. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात आज घसरणीसह झाली होती. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात बाजारात रिकव्हरी दिसून आली.
बाजारातील ठळक घडामोडी
आजच्या ट्रेडिंग सत्रात ऑईल आणि गॅस कंपन्यांचे शेअर्स वाढले. तर आयटी आणि खासगी बँकांच्या शेअर्सवर दबाव राहिला. बीएसईवर २,१३३ शेअर्स वाढले. तर १,६६१ शेअर्स घसरले. १३२ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. निफ्टी ऑइल अँड गॅस १.७ टक्के वाढीसह आघाडीवर राहिला. निफ्टी मेटल आणि ऑटो प्रत्येकी १ टक्क्यांहून अधिक वाढले. बँकिंग आणि रियल्टी शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आले. बीएसई मिडकॅप ०.७ टक्क्यांनी आणि बीएसई स्मॉलकॅप ०.५ टक्क्यांनी वाढून बंद झाला. आयटी, बँकिंग, कन्झ्यूमर ड्यूरेबल्स शेअर्समध्ये घसरण झाली. कॅपिटल गुड्स निर्देशांक २.१३ टक्क्यांनी वाढून सर्वाधिक तेजीत राहिला.
दरम्यान, ८ मे रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.४२ लाख कोटींनी वाढून ४००.८५ लाख कोटींवर पोहोचले. याआधी मंगळवारी ७ मे रोजी बाजार भांडवल ३९८.४३ लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज २.४२ लाख कोटी रुपयांनी वाढले.
बीएसई सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, एलटी, मारुती, नेस्ले इंडिया, रिलायन्स, टाटा स्टील, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स तेजीत राहिले.
एनएसई निफ्टीवर डॉ. रेड्डीज, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासीम, एचडीएफसी बँक हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. तर बीपीसीएल, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, हिंदाल्को हे शेअर्स टॉप गेनर्स होते.
फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक या शेअर्समधील घसरणीमुळे निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक ०.८ टक्क्यांनी खाली आला.
हे ही वाचा :