पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी राहिली. सेन्सेक्स २७३ अंकांनी वाढून ६५,६१७ वर बंद झाला. तर निफ्टी ८३ अंकांच्या वाढीसह १९,४३९ वर स्थिरावला. मेटल आणि पीएसयू बँक वगळता ऑटो, पॉवर, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स आणि हेल्थकेअरसह इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढून बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. मेटल आणि PSU बँका वगळता सर्व क्षेत्रांमध्ये आज खरेदी दिसून आली.
सेन्सेक्स आज ६५,५९८ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ६५,८७० अंकांपर्यंत झेप घेतली. (Stock Market Closing Bell) सेन्सेक्सवर सन फार्मा, मारुती, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, टाटा मोटर्स, आयटीसी, एशियन पेंट्स, टायटन, टेक महिंद्रा, एलटी, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बँक हे शेअर्स वाढले. तर ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी, एसबीआय, एचसीएल टेक हे शेअर्स घसरले.
NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी निव्वळ आधारावर ५८८ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स खरेदी केले, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २८८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
बाजार भांडवलानुसार भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची (RIL shares) मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. हा शेअर्स आजच्या ट्रेडिंग सत्रात २,७६४ रुपयांवर गेला. २९ एप्रिल २०२२ रोजी या शेअरने २,८५६.१५ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांक गाठला होता. आज त्याने या उच्चांकाजवळ जात व्यवहार केला. गेल्या ३ महिन्यांत रिलायन्सचा शेअर सुमारे १७ टक्क्यांनी वाढला आहे.
तैवानच्या फॉक्सकॉनने १९.५ अब्ज डॉलरच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या संयुक्त भागीदारीतून माघार घेतल्यानंतर वेदांताचे शेअर्स (Shares of Vedanta) ३ टक्क्यांनी घसरले. वेदांत आणि फॉक्सकॉन यांनी अधिक वैविध्यपूर्ण विकासाच्या संधींचा शोध घेण्यासाठी परस्पर करार करून भारतातील सेमीकंडक्टर बनवण्याचा त्यांचा संयुक्त उपक्रम संपुष्टात आणला, असे तैवानच्या निर्मात्याने सोमवारी जाहीर केले.
आशियाई बाजारात आज तेजीचे वातावरण राहिले. जपानचा निक्केई ०.०४ टक्क्यांनी आणि चीनचा ब्लू-चिप CSI300 निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला. तर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.०३ टक्क्यांनी वाढला. (Stock Market Closing Bell)
हे ही वाचा :