पुढारी ऑनलाईन डेस्क : सलग पाच दिवसांच्या 'तेजोमय' घोडदौडीनंतर आज ( दि.१६) सुरुवातीपासूनच शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी नफ्याकडे लक्ष दिले. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील, औषध निर्मिती आणि रियल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवर विक्रीमुळे दबाव दिसला. ऑटो आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये चांगली वाढ दिसून आल्याने बाजारातील उत्साह कायम राहिला. बाजाराने दिवसभरात चढ-उतार अनुभवला. अखेर आजचे व्यवहार बंद होताना प्रमुख निर्देशांक लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स 199 अंकांनी घसरून 73,128 वर आला. निफ्टीही 65 अंकांनी घसरला आणि 22,032 वर बंद झाला. दरम्यान, सोमवार, १५ जानेवारीला सेन्सेक्स 73,327.94 तर निफ्टी 22,097.50 वर बंद झाला होता
सलग पाचव्या दिवशी तेजीनंतर आज ( दि.१६) जागतिक बाजारपेठांमध्ये संमिश्र संकेताचे परिणाम शेअर बाजाराच्या व्यवहार सुरुवात होताच पाहायला मिळाले. बाजारातील प्रमुख शेअर्स लाल रंगात उघडले. सेन्सेक्स 68.25 अंकांच्या किंवा 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह 73,277.70 च्या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 16.95 अंकांच्या किंवा 0.08 टक्क्यांच्या घसरणीसह 22080.95 च्या पातळीवर व्यवहार करत होता. गुंतवणूकदारांनी आज नफ्याकडे लक्ष दिले. सकाळी 11.50 च्या सुमारास, निफ्टी 9.20 अंक किंवा 0.04 टक्क्यांच्या घसरणीसह 22,091.30 वर आणि सेन्सेक्स सुमारे 30 अंक किंवा 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह 73,299.27 वर दिसला. दुपारी 3 वाजता सेन्सेक्स 186.47 अंकांनी किंवा 0.25 टक्क्यांनी घसरून 73,141.47 वर आणि निफ्टी 62.20 अंकांनी किंवा 0.28 टक्क्यांनी घसरून 22,035.30 वर होता.अखेर निफ्टी 65 अंकांनी घसरून 22,032 वर बंद झाला.तर सेन्सेक्स 199 अंकांनी घसरला आणि 73,128 वर बंद झाला. निफ्टी बँक 33 अंकांनी घसरून 48,125 वर बंद झाला.
माहिती-तंत्रज्ञान (आयटी ), औषध निर्मिती (फार्मा) आणि रियल्टी क्षेत्रातील विक्रीमुळे बाजार नरमला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकां आणि ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्येही खरेदी झाली. मात्र, आयटी शेअर्समध्ये झंझावाती वाढ झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफ्याकडे लक्ष दिले त्यामुळे एचसीए टेक, विप्रो, आणि ऑरल फायन्यासच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण अनुभवली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स पॅकमध्ये एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्रा सर्वात जास्त घसरले. टायटन कंपनी, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, एल अँड टी आणि बजाज फायनान्स हे सेन्सेक्समध्ये सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये ठरले. नुकसान झालेल्यांमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो, टेक महिंद्रा, एनटीपीसी आणि सन फार्मा यांचा समावेश आहे.
सोमवार, १५ जानेवारीला बाजाराने सलग पाचव्या दिवशी तेजीची घौडदोड अनुभवली होती. तिसर्या तिमाहीतील चांगले निकाल आणि सर्व क्षेत्रांतील वाढीच्या जोरावर सेन्सेक्स-निफ्टी नवीन उच्चांकावर बंद झाले होते. दिवसअखेर सेन्सेक्स 759.49 अंकांनी किंवा 1.05 टक्क्यांनी वाढून 73,327.94 वर आणि निफ्टी 203.00 अंकांनी किंवा 0.93 टक्क्यांनी वाढून 22,097.50 वर बंद झाला होता. सलग पाच दिवसांच्या विक्रमी तेजीमुळे, सेन्सेक्स १,९७२.७२ अंशांनी (२.७६ टक्के) वाढला होता . या काळात गुंतवणूकदारांच्या संपत्तीने तब्बल ९.६८ लाख कोटी रुपयांचा फायदा पाहिला होता. मात्र आज गुंतवणूकदारांनी नफा वसुलीकडे लक्ष दिल्याने सेन्सेक्ससह निफ्टीने घसरण अनुभवली.
युरोपियन सेंट्रल बँकेच्या अधिका-यांनी वेगवान दर-कपात अपेक्षा कमी केल्यामुळे युरोपियन स्टॉक आणि बाँड्समध्ये घट झाल्यामुळे मंगळवारी आशियाई समभाग घसरले. ऑस्ट्रेलियन आणि जपानी समभाग घसरले, तर यूएस इक्विटीचे करार सोमवारच्या सुट्टीनंतर कमी झाले. ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंड सार्वभौम रोखे देखील विक्रीमध्ये सामील झाल्यामुळे शुक्रवारपासून त्यांच्या पहिल्या व्यापार सत्रात ट्रेझरीमध्ये घट दिसून आली. या वर्षी लवकर व्याजदर कपातीची आशा मावळल्याने आणि मध्यपूर्वेत तणाव वाढल्याने युरोपीय शेअर बाजार व्यापाराच्या सुरुवातीला घसरल्याचे दिसले.