पुणे : पुढारी वृत्तसेवा
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस 31 मार्च २०२२ अखेर आजवरची 111 वर्षातील उच्चांकी उलाढाल करीत सर्वच आघाड्यांवर यश मिळविले आहे. बँकेच्या व्यवहारांमध्ये 3 हजार 426 कोटींची वाढ होऊन ते 47 हजार 28 कोटींपर्यंत पोहोचले आहेत. बँकेच्या निव्वळ नफ्यात 238 कोटींची वाढ होऊन तो 602 कोटींवर पोहोचला असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बँकेंच्या आकडेवारीमध्ये नक्त मुल्यांमध्ये गतवर्षापेक्षा पाचशे कोटींनी वाढ होऊन तो 3 हजार 203 कोटींपर्यंत, तर बँकेचा स्वनिधी 6009 कोटींपर्यंत पोहोचला आहे. बँकेच्या ढोबळ नफ्यामध्ये 626 कोटींची भरीव वाढ होऊन तो 1 हजार 402 कोटींवर पोहोचला आहे. सर्व तरतुदी करुन बँकेचा निव्वळ नफा 302 कोटींवर पोहोचल्याचे नमूद करुन ते म्हणाले, बँकेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार बँकेच्या सेवकांची संख्या कमी केल्याने सन 2018 मध्ये असलेला प्रति सेवक व्यवसाय 26 कोटींवरुन आज 65 कोटींपर्यंत पोहोचला आहे. सर्वच आघाड्यांवर बँकेने प्रगती केलेली आहे. गेली 9 वर्षे लेखापरिक्षणामध्ये बँकेस सतत ऑडिट वर्ग अ प्राप्त होत आहे. मागील आठ वर्षे बँक सभासदांना 10 टक्क्यांइतका लाभांश देत असून, दरवर्षी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटीइतकी रक्कम देत आहे.
2011 मध्ये आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य बँकेस शासनाकडून मिळालेले शंभर कोटी रुपयांचे भागभांडवल परत दिलेले आहे. अशा प्रकारे रक्कम परत करणारी सहकार क्षेत्रातील ही एकमेव बँक ठरलेली आहे. बँकेत स्वेच्छा निवृत्ती योजना लागू केल्याने सेवकांची संख्या 1800 वरुन आता 750 झाली आहे. त्यामुळे वार्षिक 192 कोटींनी पगार खर्च कमी झालेला असून, व्यवसायात दुप्पट वाढ झाली आहे. बँकेने आपले व्यवहार जिल्हा बँका, साखर कारखान्यांपुरते मर्यादित न ठेवता नागरी सहकारी बँका, पतसंस्था, औद्योगिक क्षेत्र, राज्य वखार महामंडळाद्वारे शेतकर्यांना शेतमाल तारणावर थेट कर्जपुरवठा आदींमुळे बँकेच्या व्यवसायात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.