स्पोर्ट्स

भारत-पाकिस्तान खेळाडू एकाच संघातून खेळणार

Arun Patil

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत-पाकिस्तान या दोन शेजारील राष्ट्रांमधील द्विपक्षीय क्रिकेट सध्या बंद असून 2012-13 नंतर दोन्ही देशांमध्ये मालिका झालेली नाही, तर 2007 पासून दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध कसोटीही खेळलेले नाहीत. आयसीसी आणि एसीसी स्पर्धेच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान सामना चाहत्यांना पाहायला मिळतो. पण, आता लवकरच भारत व पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांविरुद्ध नाही, तर एकमेकांसोबत एकाच संघात खेळताना दिसणार आहेत. बीसीसीआयचे सचिव व आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.

आफ्रो-आशिया स्पर्धेच्या निमित्ताने भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघाकडून खेळताना दिसणार असल्याचे वृत्त आहे. 2023 च्या मध्यंतरात ही स्पर्धा खेळवण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना 2008 नंतर इंडियन प्रीमियर लीगमध्येही बंदी घातली गेली आहे. अशात भारत व पाकिस्तानचे खेळाडू खांद्याला खांदा लावून खेळताना दिसणे म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. 2018 पासून आशिया चषक झालेला नाही आणि या स्पर्धेचे स्वरूप आता टी-20 व वन-डे असे राहिले आहे.

2005 व 2007 मध्ये आफ्रो-आशिया चषक खेळवण्यात आला होता. एसीसीचे प्रमुख जय शाह ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. 2000 सालच्या सुमारास आशियाई इलेव्हन संघात पाकिस्तानचा शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी आणि भारताचे वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड हे एकाच संघाकडून खेळले होते. आफ्रिकन संघात दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व केनिया संघातील खेळाडूंचा समावेश होता.
आता सुधारित आफ्रो-आशियाई स्पर्धा ही टी-20 फॉरमॅटमध्ये असेल आणि पुढील वर्षी जून-जुलै मध्ये खेळवण्याचा प्रयत्न आहे. यासाठी येत्या एप्रिल महिन्यात जय शाह, आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचे नवीन चेअरमन सुमोद दामोदर आणि एसीसीच्या डेव्हलपमेंट कमिटीचे महिंदा वल्लिपूरम हे आयसीसीसोबत चर्चा करणार आहेत.

'याबाबत आम्हाला बोर्डाकडून अद्याप काही अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. पण, कागदावर चर्चा सुरू आहे आणि अंतिम प्रस्ताव दोन्ही बोर्डांकडे पाठवला जाईल. भारत व पाकिस्तान या संघांतील सर्वोत्तम खेळाडू आशियाई एकादश संघात असावेत ही आमची कल्पना आहे. एकदा का याला अंतिम स्वरूप मिळाले की त्याची घोषणा केली जाईल,' असे एसीसीचे कमर्शियल व इव्हेंटचे प्रमुख प्रभाकरन थनराज यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT