zimbabwe player sikandar raza become number 1 in icc mens odi all rounder rankings
आयसीसीने नुकतीच नवीन एकदिवसीय (ODI) रँकिंग जाहीर केली आहे, ज्यात मोठी उलथापालथ झाली आहे. झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा आता जगातील नंबर १ एकदिवसीय अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याने अफगाणिस्तानच्या दोन खेळाडूंना मागे टाकून हे स्थान पटकावले आहे.
याआधी, अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अझमतुल्ला उमरझाई पहिल्या स्थानावर होता, पण तो आता एका स्थानाने घसरून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, अफगाणिस्तानचाच आणखी एक अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी दुसऱ्यावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे.
श्रीलंकेविरुद्ध हरारे येथे झालेल्या दोन सामन्यांमधील दमदार कामगिरीमुळे सिकंदर रझाला हे यश मिळाले आहे. त्याने दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आणि एक विकेटही घेतली. या अप्रतिम कामगिरीमुळे त्याचे रेटिंग ३०२ वर पोहोचले आहे, तर मोहम्मद नबी आणि अझमतुल्ला उमरझाई यांचे रेटिंग अनुक्रमे २९२ आणि २९६ आहे.
या व्यतिरिक्त, रझा फलंदाजांच्या रँकिंगमध्येही ९ स्थानांनी पुढे सरकत २२ व्या क्रमांकावर आला आहे.
टॉप-१० अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा मेहदी हसन मिराज चौथ्या, तर न्यूझीलंडचा मायकेल ब्रेसवेल पाचव्या स्थानावर कायम आहेत. टॉप-१० मध्ये सिकंदर रझा व्यतिरिक्त मिचेल सँटनर (न्यूझीलंड) आणि रशीद खान (अफगाणिस्तान) यांनाही फायदा झाला आहे. सँटनरला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो सहाव्या, तर रशीद खान सातव्या स्थानावर पोहोचला आहे. रवींद्र जडेजा नवव्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचा रचिन रवींद्र दोन स्थानांनी पुढे सरकत १० व्या स्थानावर पोहोचला आहे.
एकदिवसीय गोलंदाजी रँकिंगमध्येही मोठे बदल झाले आहेत. श्रीलंकेचा महेश तीक्षणा पहिल्या स्थानावरून घसरून दुसऱ्या स्थानावर आला आहे. याआधी तो केशव महाराजसोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे, भारताचा रवींद्र जडेजा कोणताही सामना न खेळताही त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आठव्या स्थानावर आहे, तर श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगाला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो नवव्या क्रमांकावर आहे.