

Mitchell Starc announces retirement from T20I : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ३५ वर्षीय स्टार्कने स्पष्ट केले आहे.
स्टार्क ६५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ७९ विकेट घेतल्या. तो ऑस्ट्रेलियासाठी टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. २०२२ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध (४ विकेट) आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली होती. २०२१ मध्ये युएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा त्याचा सहभाग होता. मी ऑस्ट्रेलियासाठी प्रत्येक टी-२० सामना, विशेषतः २०२१ चा विश्वचषक, केवळ विजयामुळेच नाही तर त्या महान संघामुळे आणि त्या काळात झालेल्या मजेमुळे आनंद घेतला, असे स्टार्कने म्हटलं आहे.
कसोटी क्रिकेट हीच माझी पहिली पसंती राहिली आहे, २०२७ मधील भारतातील कसोटी दौरा, अॅशेस आणि २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक लक्षात घेता, या निर्णयामुळे मला या मोठ्या स्पर्धांसाठी तंदुरुस्त राहण्यास मदत होईल. तसेच, नवीन गोलंदाजांना पुढील टी२० विश्वचषकासाठी तयारी करण्यासाठी वेळ मिळेल, असे स्टार्कने सांगितले. पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका खेळेल. तसेच दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड दौरा करणार आहे. जानेवारी २०२७ मध्ये भारतात पाच कसोटी सामने खेळणार आहे. मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कसोटी आणि त्यानंतर २०२७ मध्ये इंग्लंडमध्ये होणारी अॅशेस मालिका यांचा समावेश आहे.ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे एकदिवसीय विश्वचषक होणार आहे.
ऑस्ट्रेलिया निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी स्टार्कच्या टी२० कारकिर्दीचे कौतुक केले. ते म्हणाले, "मिचेलला त्याच्या टी२० कारकिर्दीचा अभिमान वाटला पाहिजे. तो २०२१ चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा एक महत्त्वाचा भाग होता. निर्णायक क्षणी त्याच्या विकेट घेण्याच्या क्षमतेने अनेक वेळा सामन्यांचे निकाल बदलले. आम्ही योग्य वेळी त्याच्या टी२० कारकिर्दीचा सन्मान करू, परंतु तो कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये बराच काळ खेळू इच्छितो ही आनंदाची बाब आहे."