Yuzvendra Chahal Viral Video: आयपीएल 2026 मध्ये मैदानावर शानदार कामगिरी करणारा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे चहलवर टीकेची झोड उठली आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये चहल कार चालवत असताना दिसत आहे. त्याच्यासोबत एक मित्रही गाडीत बसलेला आहे. मात्र, याच दरम्यान चहल चालत्या कारमधून जळती सिगारेट बाहेर फेकताना दिसतो. हा व्हिडिओ एका चाहत्याने शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आणि काही क्षणातच तो व्हायरल झाला.
या व्हिडिओनंतर चहलवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अनेकांनी त्याच्या या वर्तनावर आक्षेप घेतला आहे. जळती सिगारेट बाहेर फेकल्याने इतर वाहनचालकांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी टीका नेटिझन्स करत आहेत. काही जणांनी तर चहलसारख्या सेलिब्रिटीने जबाबदारीने वागायला हवे, असेही म्हटले आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणावर चहलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मैदानावर मात्र चहलची कामगिरी चांगली राहिली आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याने आतापर्यंत 2 सामन्यांत प्रभावी गोलंदाजी केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने 28 धावा देत 2 विकेट्स घेतल्या, तर चेन्नईविरुद्ध 21 धावांत 1 विकेट मिळवली. कोलकाता विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्याला तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली नाही.
एकीकडे मैदानावर दमदार प्रदर्शन आणि दुसरीकडे मैदानाबाहेरचा वाद, अशा दोन्ही कारणांनी युझवेंद्र चहल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.