Yashasvi Jaiswal Video: भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल हा २८ डिसेंबरला २४ वर्षाचा झाला. त्याने यंदाचा वाढदिवस हा आपल्या कुटुंबासमवेत अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा केला. यशस्वी जयस्वालला भारतात होणाऱ्या टी २० वर्ल्डकप २०२६ च्या संघात संधी मिळालेली नाही. मात्र न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्यांची निवड होण्याची शक्यता आहे. ११ जानेवारीपासून होणाऱ्या या वनडे मालिकेसाठी या आठवड्याच्या शेवटी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, टीम इंडियातील दिग्गज खेळाडू विजय हजारे ट्रॉफी खेळून ती गाजवत असताना यशस्वी मात्र या स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांना मुकला. फूड पॉईजनिंग झाल्यामुळं त्याला मुंबईकडून पहिले तीन सामने खेळता आले नाहीत. आता तो पूर्णपणे फिट झाला असून तो ३१ डिसेंबर रोजी गोव्याविरूद्धच्या सामन्यात मुंबईकडून खेळणार आहे.
यशस्वीनं आपला २४ वा वाढदिवस आपल्या कुटुंबासमवेत साजरा केला. यशस्वीचा वाढदिवस हा नागपूरमधील राजस्थान रॉयल्सच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये साजरा करण्यात आला. त्यावेळी यशस्वीनं मेणबत्तीऐवजी समई प्रज्वलित केली. त्यानंतर केक कापून तो आधी आई वडिलांना भरवला. त्यानंतर त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला.
यशस्वीचा जन्म २८ डिसेंबर २००१ रोजी उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात झाला होता. त्यावेळी तो भारतीय क्रिकेट संघातला स्टार खेळाडू होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र बालपण कष्टात काढणारा यशस्वी फक्त १० वर्षाचा असताना मुंबईत आला. तो आझाद मैदानाजवळ तंबूत रात्र काढायचा. तो उदर निर्वाहासाठी डेअरीत देखील काम करत होता. कधी कधी तो पाणीपुरी देखील विकत होता.
प्रसिद्ध प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी यशस्वी जयस्वालची गुणवत्ता ओळखली अन् त्याला कोचिंग करण्यास सुरूवात केली. यशस्वीनं शालेय क्रिकेट स्पर्धेत ३१९ धावांची नाबाद खेळी करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. त्यानंतर त्यानं मुंबई क्रिकेट संघात स्थान मिळवत १७ व्या वर्षी लीस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकले.
तो २०२० मध्ये १९ वर्षाखालील वर्ल्डकप देखील खेळला. त्यावेळी तो स्पर्धेतला टॉप स्कोअरर आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देखील राहिला. तिथून पुढे यशस्वीनं मागं वळून पाहिलं नाही. आयपीएल गाजवल्यानंतर त्यानं टीम इंडियात देखील प्रवेश मिळवला.