स्पोर्ट्स

WTC Final : ‘लॉर्ड्स’वर स्मिथचा ऐतिहासिक पराक्रम! 99 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत बनला सर्वाधिक धावा चोपणारा ‘विदेशी’ फलंदाज

ICC नॉकआउट सामन्यांमध्ये सर्वाधिक 50+ स्कोअर करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही स्मिथने सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

रणजित गायकवाड

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर नवा इतिहास रचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात 66 धावांची संयमी खेळी करत स्मिथने लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज हा मान पटकावला आहे.

99 वर्षांचा विक्रम मोडला

स्मिथने लॉर्ड्सवर 591 धावा पूर्ण करत ऑस्ट्रेलियाच्या वॉरेन बार्डस्ले यांचा 99 वर्ष जुना विक्रम मोडला. बार्डस्ले यांनी 1909 ते 1926 दरम्यान 575 धावा केल्या होत्या. स्मिथने लॉर्ड्सवर आतापर्यंत 2 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत आता स्मिथ (591), बार्डस्ले (575), गॅरी सोबर्स (571), डॉन ब्रॅडमन (551), शिवनारायण चंद्रपॉल (512), दिलीप वेंगसरकर (508) आणि एलन बॉर्डर (503) अशी नावे आहेत.

इंग्लंडमध्ये सर्वाधिक 50+ स्कोअर करणारा परदेशी फलंदाज

स्टीव्ह स्मिथने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या विदेशी फलंदाजांच्या यादीत स्मिथ आता अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने 23 टेस्ट सामन्यांत 18 वेळा 50+ धावा केल्या आहेत. याआधी एलन बॉर्डर आणि सर विवियन रिचर्ड्स यांनी 17 वेळा अशी कामगिरी केली होती.

इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारे विदेशी फलंदाज

  • स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) : 18

  • व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडिज) : 17

  • अ‍ॅलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया) : 17

  • डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) : 14

  • गारफिल्ड सोबर्स (वेस्ट इंडिज) : 14

  • शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज) : 12

  • सचिन तेंडुलकर (भारत) : 12

  • मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया) : 12

  • इयान चॅपेल (ऑस्ट्रेलिया) : 11

  • मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) : 11

  • स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया) : 11

सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये स्मिथने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 42वे अर्धशतक ठोकले. यासोबतच, आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये सर्वाधिक 50+ स्कोअर करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. स्मिथने 7 वेळा 50+ धावा केल्या असून, या यादीत त्याच्या पुढे फक्त विराट कोहली (10) आहेत.

स्मिथच्या विक्रमी खेळीमुळे लॉर्ड्सवर नवा इतिहास

स्टीव्ह स्मिथने लॉर्ड्सवर 66 धावांची खेळी करताना केवळ ऑस्ट्रेलियाच नव्हे, तर जागतिक क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे लॉर्ड्सवरील विदेशी फलंदाजांचा विक्रम आणि इंग्लंडमधील 50+ स्कोअरचा विक्रम दोन्ही त्याच्या नावावर झाले आहेत. क्रिकेटप्रेमींमध्ये स्मिथच्या या ऐतिहासिक कामगिरीचे जोरदार कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT