wtc 2025 final australia vs south africa prize money
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाचा अंतिम सामना पुढील महिन्यात खेळला जाणार आहे. यंदा ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेचे संघ अंतिम फेरीत आमनेसामने येतील. 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड्सवर खेळल्या जाणा-या सामन्यापूर्वी आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. यावेळी WTC जिंकणाऱ्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल हे ICC ने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे जिंकणारा संघच केवळ मालामाल होणार नसून उपविजेत्या संघावरही धन वर्षा होणार आहे.
ICCने यंदाच्या WTC फायनल सामन्याच्या बक्षिस रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. यावेळी विजेत्या संघाला गेल्या दोन स्पर्धांच्या तुलनेत दुप्पट म्हणजे बक्षीस रक्कम मिळेल. द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेत्या संघाला सुमारे 30 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघालाही सुमारे 18.5 कोटी रुपये मिळतील.
यावेळी विजेत्या संघाची बक्षीस रक्कम गेल्या दोन अंतिम सामन्यांमधील न्यूझीलंड (2021) आणि ऑस्ट्रेलिया (2023) च्या विजेत्यांनी जिंकलेल्या रकमेपेक्षा 17.96 कोटी रुपयांनी जास्त आहे. गेल्या दोन हंगामांमध्ये विजेत्या संघाला 13.68 कोटी रुपये, तर उपविजेत्याला 6.84 कोटी रुपये देण्यात आले होते.
WTC फायनलच्या बक्षिस रक्कमेबाबत आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यात म्हटलंय की, ‘बक्षीसाची ही रक्कम म्हणजे आयसीसीच्या कसोटी क्रिकेट आणि 9 संघांमधील सर्वोत्तम खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. मला खात्री आहे की लॉर्ड्सवरील प्रेक्षकांना तसेच जगभरातून येणाऱ्या चाहत्यांना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक उत्तम WTC अंतिम सामना पाहायला मिळेल.’
आयसीसीने केवळ विजेत्या आणि उपविजेत्या संघावरच नव्हे तर इतर संघांवरही पैशांचा वर्षाव केला आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या टीम इंडियाला जवळपास 12.5 कोटी रुपये आणि टेबलमध्ये नवव्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानलाही सुमारे 41 लाख रुपये मिळतील. त्याच वेळी, 2021 च्या अंतिम फेरीतील विजेता आणि यावेळी चौथ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडला सुमारे 10.2 कोटी रुपये मिळतील.
पाचव्या स्थानावरील इंग्लंडला 8.2 कोटी रुपये
सहाव्या स्थानावरील श्रीलंकेला 7.1 कोटी रुपये
सातव्या स्थानावरील बांगलादेशला 6.1 कोटी रुपये
आठव्या स्थानावरील वेस्ट इंडिजला 5.1 कोटी रुपये