भारतात होणाऱ्या आगामी महिला विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. बेंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारे सामने आता नवी मुंबईतील मैदानावर खेळवण्याचा मोठा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली महिला वनडे विश्वचषकचे आयोजन होणार असून, यात एकूण ८ संघ सहभागी होतील. तथापि, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बेंगळूरु येथे झालेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे आयसीसीला वेळापत्रकात हे फेरबदल करावे लागले आहेत.
आयपीएलचे विजेतेपद आरसीबी संघाने पटकावल्यानंतर, या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आरसीबीचे खेळाडू बेंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर एकत्र आले होते. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक चाहत्यांना आपले प्राण गमवावे लागले.
या दुर्घटनेनंतर कर्नाटक सरकारने एका चौकशी आयोगाची स्थापना केली. या आयोगाने एम. चिन्नास्वामी स्टेडियम मोठ्या आयोजनांसाठी असुरक्षित असल्याचा अहवाल दिला. या अहवालानंतरच आयसीसीने सुरक्षेच्या कारणास्तव बेंगळूरु येथे सामने न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
बेंगळूरु येथील सामने रद्द झाल्याने त्यांचे आयोजन नवी मुंबई आणि गुवाहाटी येथे करण्यात आले आहे. तसेच, कोलंबो येथील एक सामनाही नवी मुंबईला स्थलांतरित करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार बदल खालीलप्रमाणे आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका (३० सप्टेंबर) : हा सामना बेंगळूरुऐवजी आता गुवाहाटी येथे खेळवला जाईल.
इंग्लंड विरुद्ध द. आफ्रिका (३ ऑक्टोबर) : हा सामनाही बेंगळूरुऐवजी गुवाहाटी येथेच होईल.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (२० ऑक्टोबर) : कोलंबो येथे नियोजित असलेला हा सामना आता नवी मुंबईत खेळवला जाईल.
याव्यतिरिक्त, बेंगळूरु येथे होणारे भारत विरुद्ध न्यूझीलंड (२३ ऑक्टोबर) आणि भारत विरुद्ध बांगलादेश (२६ ऑक्टोबर) हे दोन महत्त्वाचे सामनेही आता नवी मुंबईला हलवण्यात आले आहेत.
अंतिम सामना नवी मुंबई किंवा श्रीलंकेतील कोलंबो येथे होण्याची दाट शक्यता आहे.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत नवी मुंबई हे महिला क्रिकेटचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. आंतरराष्ट्रीय सामने आणि महिला प्रीमियर लीगदरम्यान (WPL) येथील चाहत्यांकडून मिळालेला पाठिंबा खेळाडूंसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरला आहे. मला खात्री आहे की, हीच ऊर्जा १२ वर्षांनंतर भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकातील मोठ्या सामन्यांना एक नवी उंची मिळेल.’