IND vs SA Final T20 Pudhari
स्पोर्ट्स

IND vs SA Final T20: अहमदाबादचा AQI किती आहे? भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील पाचवा T-20 सामनाही रद्द होणार?

IND vs SA Final T20: लखनऊमधील चौथा टी20 सामना प्रदूषणामुळे रद्द झाल्यानंतर अहमदाबादमधील अंतिम सामन्याबाबत चिंता वाढली आहे. लखनऊच्या तुलनेत प्रदूषण खूपच कमी असल्याने सामना नियोजित वेळेत होण्याची शक्यता अधिक आहे.

Rahul Shelke

Ahmedabad AQI IND vs SA T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी 20 सामना रद्द झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे हा सामना पावसामुळे नाही, तर प्रदूषणामुळे रद्द करण्यात आला. लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये प्रदूषण इतके वाढले होते की खेळाडूंना खेळणे शक्य झाले नाही. यानंतर आता मालिकेतील पाचव्या आणि अंतिम टी20 सामन्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

हा निर्णायक सामना शुक्रवारी संध्याकाळी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. लखनऊच्या तुलनेत अहमदाबादचे मैदान आणि हवामान सहसा खेळासाठी अनुकूल मानले जाते. येथे अनेकदा चुरशीचे टी20 सामने पाहायला मिळतात. सध्या भारत हा पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा आघाडीवर आहे. एक सामना रद्द झाल्यामुळे भारताने आधीच मालिका जिंकली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेला हा शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याची संधी आहे.

अहमदाबादमधील हवेची गुणवत्ता काय आहे?

लखनऊमध्ये झालेल्या प्रकारानंतर आता अहमदाबादमधील हवेच्या गुणवत्तेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौथ्या टी20 दरम्यान हार्दिक पांड्याने मास्क घातलेला दिसल्याने प्रदूषणाची चर्चा अधिक वाढली. सध्या देशातील अनेक भागांत प्रदूषण ही मोठी समस्या असली, तरी अहमदाबादची स्थिती तुलनेने नियंत्रणात असल्याचे दिसते.

18 डिसेंबर रोजी अहमदाबादचा AQI (हवाचा गुणवत्ता निर्देशांक) सुमारे 139 होता, जो ‘मध्यम’ श्रेणीत आहे. 19 आणि 20 डिसेंबर दरम्यान PM2.5 कणांमुळे AQI वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. सध्या अहमदाबादचा AQI सुमारे 174 आहे.

सामना रद्द होण्याची शक्यता आहे का?

तज्ज्ञांच्या मते, अहमदाबादमध्ये AQI जरी थोडा जास्त असला, तरी त्यामुळे फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे सामना खेळण्यात अडथळा येण्याची शक्यता कमी आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अहमदाबादमधील प्रदूषणाची पातळी लखनऊच्या तुलनेत खूपच कमी आहे.

लखनऊमध्ये चौथ्या टी20दरम्यान AQI जवळपास 490 पर्यंत पोहोचला होता, ज्यामुळे सामना रद्द करावा लागला. त्याच्या तुलनेत अहमदाबादची परिस्थिती बरीच चांगली आहे. त्यामुळे सध्याच्या अंदाजानुसार भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी20 सामना ठरलेल्या वेळेनुसार होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT