

अहमदाबाद : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आव्हानात्मक मालिकेत आज (शुक्रवार दि. 19 ) पाचव्या व शेवटच्या टी-20 लढतीत विजय मिळवत मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. आतापर्यंत किंचित सरस कामगिरी साकारणारा भारतीय संघ या 5 सामन्यांच्या मालिकेत तूर्तास 2-1 फरकाने आघाडीवर आहे.
आता या शेवटच्या लढतीत एकीकडे, भारतीय संघ मालिका विजयासाठी प्रयत्नशील असेल, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकन संघ येथे बाजी मारत मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल. आजच्या लढतीला सायंकाळी 7 वाजता सुरुवात होईल.
द. आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेने भारतीय संघाच्या निवडीबाबत काही कठीण प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, फलंदाजीतील त्रुटीही समोर आणल्या आहेत. प्रारंभी, कसोटी मालिकेत 0-2 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताने वन-डे मालिकेत शानदार पुनरागमन केले होते. आता वन-डे तील तोच धडाका टी-20 मध्येही गाजवण्याचा भारताचा इरादा असेल.
कोणत्याही परिस्थितीत भारत ही मालिका गमावू शकत नाही, ही बाब मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी दिलासादायक आहे. मात्र, टी-20 विश्वचषक अवघ्या दोन महिन्यांवर असताना कर्णधार सूर्यकुमार यादव व शुभमन गिल यांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे. यापैकी शुभमन गिल हा सध्या दुखापतीशी झुंजत आहे.
काही काळापूर्वी मानांकनात अव्वल क्रमांकावर आरुढ झालेला सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. या वर्षातील 20 सामन्यांतील 18 डावांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. अवघ्या 14.20 च्या सरासरीने 213 धावा करणाऱ्या सूर्याचे अपयश भारतीय गोटात चिंता वाढवणारे आहे.
दुसरीकडे शुभमन गिलचे पुनरागमनही फलंदाजीच्या दृष्टीने साधारण राहिले आहे. त्यातच चौथ्या सामन्यापूर्वी झालेल्या पायाच्या दुखापतीमुळे तो अंतिम सामन्याला मुकणार आहे. यापूर्वी मानेच्या दुखापतीमुळे तो कसोटी मालिकेलाही मुकला होता. गिलच्या अनुपस्थितीत सलामीच्या जागेसाठी संजू सॅमसन हा प्रबळ दावेदार मानला जात आहे. सॅमसनने खालच्या क्रमांकावर फारशी प्रभावी कामगिरी केलेली नसली, तरी सलामीला त्याने 14 डावांत तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे या संधीचे सोने करण्यास तो उत्सुक असेल.
हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे या अष्टपैलू खेळाडूंनी तिन्ही सामन्यांत स्थान कायम राखले आहे. वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांची जोडी जमू लागली आहे, तर वैयक्तिक कारणास्तव तिसऱ्या सामन्यात अनुपस्थित असलेला जसप्रीत बुमराह पुन्हा संघात परतला आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत 6 बळी घेत चमक दाखवली असली, तरी अहमदाबादची फलंदाजीला पूरक खेळपट्टी त्याच्यासमोर मोठे आव्हान उभे करू शकते.
मालिकेत चढ-उतार पाहणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी शुक्रवारचा सामना मालिका बरोबरीत सोडवण्याची शेवटची संधी असेल. रिझा हेंड्रिŠसच्या जागी एडन मार्करामचा सलामीला समावेश करण्याबाबत पाहुणा संघ विचार करू शकतो. तसेच, युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत लुंगी एन्गिडी आणि ओटनील बार्टमन यांनी आतापर्यंत प्रभावी कामगिरी केली आहे.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, संजू सॅमसन, जितेश शर्मा, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रिŠस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, डोनोव्हन फरेरा, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, ओटनील बार्टमन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एनरिक नॉर्खिया, लुथो सिपामला.