who will be the next india t20 captain after suryakumar yadav: बीसीसीआयने भारताचा विश्वविजेता टी २० कर्णधार सूर्यकुमार यादवला डच्चू देण्याचा निश्चय केला आहे असे विश्वसनीय सूत्रांकडून वृत्त मिळत आहे. भारतीय संघ काही दिवसातच आपले पुढचे टी २० सायकल सुरू करणार आहे. त्यापूर्वी भारताला गतवर्षीचा टी २० वर्ल्डकप जिंकून देणारा सूर्यकुमार यादवची संघातील जागा अन् कर्णधारपद धोक्यात आले आहे.
सूर्यकुमार यादवला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजीत म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील मुंबईकडून खेळताना त्याची बॅट काही तळपली नाही. त्यामुळं बीसीसीआय त्याला आगामी टी २० मालिकांमध्ये संघात ठेवणार नाही की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या सूत्रांकडून बीसीसीआय आज गुरूवारी उच्चस्तरीय समितीची बैठक घेण्याची शक्यता आहे. यात भारताचा पुढचा टी २० कर्णधार कोण असेल याबाबतची घोषणा होण्याची शक्यता देखील आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सूर्यकुमार यादवला फक्त कर्णधारपदच नाही तर संघातील स्थान देखील गमावण्याची दाट शक्यता आहे.
आता भारतीय टी २० संघाचा पुढचा कर्णधार ठरवण्यासाठी निवडसमिती, वरिष्ठ बीसीसीआय अधिकारी आणि कोच गौतम गंभीर यांची बैठक होणार आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने देखील दिले आहे. मात्र बीसीसीआयने याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सध्या टी २० चा पुढचा कर्णधार म्हणून तीन नावे चर्चेत आहेत.
श्रेयस अय्यरने डिसेंबर २०२३ मध्ये भारताकडून शेवटचा टी २० सामना खेळला होता. त्यानंतर तो वनडे संघातील एक प्रमुख खेळाडू म्हणून संघात आहे. त्याने नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी केली आहे. त्याने २०२४ च्या आयपीएल हंगामात केकेआरला विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर त्याने पंजाब किंग्जला २०२५ च्या हंगामात फायनलपर्यंत नेलं होतं. कर्णधार म्हणून त्याचे रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यामुळं भारताचा पुढचा टी २० कर्णधार म्हणून तो एक आदर्श पर्याय आहे.
बीसीसीआय एक धक्कादायक नाव देखील पुढे करू शकतं ते नाव म्हणजे मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा! गेल्या काही वर्षांपासून तिलक हा भारतीय टी २० संघाचा एक प्रमुख खेळाडू म्हणून संघात आहे. त्याने भारतीय अ संघाचे नेतृत्व करताना आपल्यातील नेतृत्व गुण दाखवून दिले होते. तसेच तो प्रभाशाली खेळी करून सामना एकहाती जिंकून देण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. निवडसमिती त्याच्यावर देखील आपला दाव खेळू शकते.
विकेटकिपर फलंदाज इशान किशन हा देखील भारतीय टी २० संघाच्या कर्णधापदासाठीचा एक चांगला पर्याय असू शकतो. किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने झारखंडचे नेतृत्व केले होते. त्याने आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. किशनने नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामात सनराईजर्स हैदराबादचे हंगामी कर्णधारपद देखील भूषवलं. त्यामुळं त्याच्या कर्णधारपदाच्या दावेदारीला अजूनच बळ मिळालं आहे.
सध्याच्या घडीला जरी ही तीन नावे प्रामुख्याने चर्चेत असली तरी भारतीय संघाचा टी २० कर्णधार म्हणून शुभमन गिलचा देखील विचार केला जाऊ शकतो. गेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र नुकत्याच झालल्या आयपीएलमध्ये गिलने फलंदाजीत दमदार कामगिरी तर केलीच त्याचबरोबर तो गुजरात टायटन्सला आपल्या नेतृत्वात फायनलपर्यंत घेऊन गेला. जर बीसीसीआय तीनही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार करण्यासाठी उत्सुक असेल तर टी २० पुनरागमनासह गिलच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ देखील पडू शकते.