Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला दुहेरी झटका! टीम इंडियाच्या कर्णधारपदाचे स्वप्न भंगणार; शुभमन गिल मारणार बाजी?

सूर्यकुमार यादव हे आता फार काळ भारतीय T20 संघाचे कर्णधार राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला दुहेरी झटका! टीम इंडियाच्या कर्णधारपदाचे स्वप्न भंगणार; शुभमन गिल मारणार बाजी?
Published on
Updated on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या टी-२० कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या श्रेयस अय्यरला आता दुहेरी फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आयपीएलच्या चालू हंगामात त्यांच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सची कामगिरी आणि गुणतालिकेतील स्थान पाहता, अय्यरच्या कर्णधारपदाच्या स्वप्नाला मोठा सुरुंग लागला आहे.

पंजाब किंग्सचा प्रवास आणि स्वप्नभंग

पंजाब किंग्सने यंदाच्या आयपीएल हंगामाची धमाकेदार सुरुवात केली होती. सुरुवातीच्या टप्प्यात संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत सहा विजय नोंदवले होते आणि १३ गुणांपर्यंत मजल मारली होती. एका सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने मिळालेल्या एका गुणाचाही त्यांना फायदा झाला होता. मात्र, त्यानंतर पराभवाचे जे सत्र सुरू झाले, ते थांबण्याचे नावच घेत नव्हते. शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवून संघाने १५ गुणांपर्यंत मजल मारली असली, तरी राजस्थान रॉयल्सच्या विजयामुळे त्यांचे प्लेऑफमधील स्थान हुकले आणि संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर फेकला गेला.

कर्णधारपदाच्या शर्यतीतून माघार?

जेव्हा श्रेयस अय्यर आणि पंजाब किंग्सचा संघ विजयरथावर स्वार होता, तेव्हा अय्यर भारतीय T20 संघाच्या कर्णधारपदासाठी अग्रक्रमी मानले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखालील संघाची शिस्तबद्ध कामगिरी आणि स्वतः अय्यर यांनी केलेली फलंदाजी यामुळे त्यांच्या नावाची चर्चा जोरात होती. मात्र, आयपीएलच्या उत्तरार्धात संघाचा झालेला घसरगुंडीचा प्रवास आणि प्लेऑफमधील अनुपस्थिती यामुळे आता त्यांच्या कर्णधारपदाच्या दाव्याची हवा निघून गेली आहे. एकीकडे आयपीएल जेतेपदाचे स्वप्न भंगले असताना, आता भारतीय संघाच्या नेतृत्वाचा दावाही कमकुवत होताना दिसत आहे.

शुभमन गिलने मारली बाजी

भारतीय संघ आगामी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानात उतरण्यास सज्ज होत आहे. अशातच, सूर्यकुमार यादव हे आता फार काळ भारतीय T20 संघाचे कर्णधार राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर, गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये नेणारा कर्णधार शुभमन गिल आता आघाडीवर आला आहे. गिलने केवळ आपल्या नेतृत्वानेच नव्हे, तर फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे. या हंगामात आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक धावा करत त्याने 'ऑरेंज कॅप'च्या शर्यतीतही आपले स्थान पक्के केले आहे.

आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) भविष्यातील T20 कर्णधाराबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. श्रेयस अय्यरसाठी हा काळ अत्यंत कठीण असून, त्यांना आपल्या कर्णधारपदाच्या दाव्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आता अधिक संघर्षाची गरज भासणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news