

Sanju Samson T20 Captain: भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदाबाबत सध्या क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म पाहता त्याच्याकडून टी-२० संघाचे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते, अशा चर्चांना वेग आला आहे. सुरुवातीला श्रेयस अय्यरचे नाव पुढे येत होते. मात्र आता एका नव्या अहवालात श्रेयस नव्हे, तर संजू सॅमसन हा भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी आलेल्या अहवालानुसार, निवड समिती सूर्यकुमार यादवच्या सततच्या खराब कामगिरीमुळे त्याच्याबाबत कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवडताना त्याला विश्रांती दिली जाऊ शकते किंवा संघातूनही बाहेर ठेवले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
एका वृत्तानुसार, जर सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आले, तर संजू सॅमसनला टी-२० संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते. यामागे काही महत्त्वाची कारणेही सांगितली जात आहेत.
२०२४ टी-२० वर्ल्ड कपनंतर संजू सॅमसन सातत्याने भारतीय संघाचा भाग राहिला आहे. विशेष म्हणजे, २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजेतेपदात त्याने मोठी भूमिका बजावली होती. स्पर्धेत शानदार फलंदाजी करत त्याने ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कारही जिंकला होता.
सॅमसनने आतापर्यंत भारतासाठी ६२ टी-२० सामने खेळले असून १३९९ धावा केल्या आहेत. क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलमध्ये त्याने महत्त्वाच्या खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे निवड समिती त्याच्याकडे भविष्यातील नेतृत्वाचा पर्याय म्हणून पाहत असल्याचे बोलले जात आहे.
पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर सातत्याने प्रभावी कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने मागील हंगामात फायनल गाठली होती. यंदाही संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. फलंदाज म्हणूनही अय्यरने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे.
तरीही त्याला लगेच टी-२० संघाचे कर्णधारपद देण्याबाबत निवड समिती पूर्णपणे सहमत नसल्याचे समोर आले आहे. कारण, अय्यर बराच काळ भारतीय टी-२० संघाबाहेर आहे. त्याने अखेरचा टी-२० सामना २०२३ मध्ये खेळला होता. त्यामुळे थेट संघात पुनरागमन करून त्याला कर्णधार बनवणे योग्य ठरेल का, याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे.
जर निवड समितीने सूर्यकुमार यादववर विश्वास कायम ठेवला आणि त्याची आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी निवड केली, तर तोच टी-२० संघाचा कर्णधार राहणार आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसनला उपकर्णधारपद दिले जाऊ शकते.
दरम्यान, मागील टी-२० वर्ल्ड कपमध्ये अक्षर पटेल उपकर्णधार होता. मात्र आयपीएल २०२६ मधील त्याची कामगिरी निराशाजनक राहिल्यामुळे नेतृत्वाच्या शर्यतीत त्याचे नाव मागे पडल्याचे मानले जात आहे.