Who is Praful Hinge pudhari
स्पोर्ट्स

Who is Praful Hinge: सूर्यवंशीला भोपळा देणारा... ४ विकेट घेणार लिहून ठेवणारा, कोण आहे हा नागपूरचा पोट्टा प्रफुल हिंगे?

Anirudha Sankpal

Who is Praful Hinge IPL 2026: सनराईजर्स हैदराबादचा युवा वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगने आपले आयपीएल पदार्पण स्मरणीय केलं. त्यानं राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात इतिहास रचला. सामना झाल्यानंतर त्यानं पदार्पणातच आपण ४ ते ५ विकेट्स घेणार असं लिहून ठेवलं होतं असं सांगितलं. त्यानं जे लिहून ठेवलं ते पहिल्याच सामन्यात करून देखील दाखवलं.

विदर्भच्या या वेगवान गोलंदाजाने नव्या चेंडूवर राजस्थानच्या टॉप ऑर्डरची दैना उडवून दिली. २१७ धावांचे अवाढव्य आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाला सुरूवातीलाच धक्के देत हैदराबादनं सामन्यावर पकड निर्माण केली.

लिहून ठेवलेलं खरं करणारा प्रफुल

प्रफुल हिंगेने आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये २ षटकात फक्त ६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याने सुरूवातीच्या षटकातच राजस्थानची अवस्था ५ बाद ९ धावा अशी करून टाकली.

हिंगेने सामन्यानंतर सांगितलं की त्याने पदार्पणाच्या सामन्यात आपण ४ ते ५ विकेट घेणार हे लिहून ठेवलं होतं. मी पॉवर प्लेमध्ये धडाकेबाज कामगिरी करण्याचा विचार केला होता. मी मॅनिफेस्टेशनवर विश्वास ठेवतो. हिंगेने सांगितलं की त्याने वैभव सूर्यवंशीला बाऊन्सवर आऊट करणार हे आधीच ठरवलं होतं. मी अनेकांना सांगितलं होतं की मी त्याला बाऊन्सर टाकणार आहे. वरूण भाईने मला हा प्लॅन करण्यास मदत केली होती.

१३ वर्षापासून क्रिकेट खेळणाऱ्या हिंगेने आपली ही कामगिरी आपल्या कुटंबियांना समर्पित केली आहे. त्याने वयाच्या १३ व्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी मला लेदर बॉल काय असतो याची कल्पना देखील नव्हती.

कोण आहे प्रफुल हिंगे?

प्रफुल हिंगेचा जन्म १८ जानेवारी २००२ मध्ये नागपूर इथं झाला. प्रफुल प्रकाश हिंगे हा उंच पुरा मध्य गती गोलंदाज आहे. तो त्याच्या बाऊन्स आणि अचूक माऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. तो पाटा विकेटवर देखील दमदार गोलंदाजी करू शकतो. त्याने २०२४-२५ मध्ये विदर्भकडून वरिष्ठ संघात पदार्पण केलं. तो २०२४ - २५ मध्ये रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा महत्वाचा सदस्य बनला. त्याचबरोबर विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील त्यानं भरीव कामगिरी केली.

त्याने आतापर्यंत १० प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने २७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी ही २६.६६ इतकी असून त्याने सहा अ श्रेणीचे सामने देखील खेळले आहेत. त्यात त्याने ५ विकेट्स घेतल्या असून आतापर्यंत त्यानं एकच टी २० सामना खेळला आहे. त्यात त्यानं १ विकेट घेतली आहे.

टी २० लीगमध्ये उल्लेखनीय कामगिरी

प्रफुल हिंगेने विदर्भ प्रो टी २० लीगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. तिथे त्याने ६ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं मोठा आणि नियंत्रित बॉलिंग स्पेल टाकण्याच्या आपल्या क्षमतेनं आयपीएल स्काऊटला प्रभावित केलं होतं.

हिंगेने २०२२ मध्ये एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये आपल्या गोलंदाजीला अजूनच धार निर्माण केली होती. त्याने ब्रिसबेनमध्ये देखील १५ दिवसाचे सराव सत्र केले होते. कष्ट करण्याची तयारी आणि भन्नाट पेस यामुळं तो सनराईजर्स हैदराबादसाठी एक महत्वाचा खेळाडू बनला. हैदराबादने त्याला ३० लाखाला आपल्या गोटात घेतलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT