Who is Ajitesh Argal Pudhari
स्पोर्ट्स

Ajitesh Argal: विराट कोहलीसोबत जिंकला होता वर्ल्ड कप; आता IPL मध्ये करतोय अंपायरिंग, कोण आहे अजितेश अर्गल?

Who is Ajitesh Argal: विराट कोहली आणि त्याचा अंडर-१९ वर्ल्ड कपमधील सहकारी अजितेश अर्गल IPL सामन्यानंतर पुन्हा एकत्र दिसले. एकेकाळी विराटसोबत वर्ल्ड कप जिंकणारा अजितेश आता IPL मध्ये अंपायर आहे.

पुढारी वृत्तसेवा

Who is Ajitesh Argal: विराट कोहली आणि अंपायरची झालेली भेट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. विराट कोहली ज्या अंपायरशी बोलताना दिसला, तो साधासुधा अंपायर नव्हता. तो होता २००८ च्या अंडर-१९ वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील त्याचा जुना सहकारी अजितेश अर्गल.

सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एकतर्फी विजय मिळवला. अवघ्या ६.३ षटकांत ७६ धावांचे लक्ष्य गाठत बंगळुरूने ९ विकेट्सने सामना जिंकला. पण सामन्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती विराट कोहली आणि अजितेश अर्गल यांच्या भेटीची.

१७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र

२००८ मध्ये मलेशियामध्ये झालेल्या आयसीसी अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. त्या संघात अजितेश अर्गल हा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्गलने जबरदस्त गोलंदाजी करत ५ षटकांत फक्त ७ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्या शानदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारही मिळाला होता. भारताच्या विजेतेपदात त्याचा मोठा वाटा होता.

मात्र त्यानंतर विराट कोहलीने मागे वळून पाहिलेच नाही, तर अर्गलचा प्रवास वेगळ्या दिशेने गेला. त्याला आयपीएलच्या पहिल्या हंगामात तेव्हाच्या Punjab Kings संघाने संधी दिली होती. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत आणि हळूहळू तो क्रिकेटपासून दूर गेला.

क्रिकेटमधील सक्रिय कारकीर्द थांबल्यानंतर अजितेश अर्गल आयकर विभागात रुजू झाला. मात्र क्रिकेटशी त्याचं नातं कायम राहिलं. २०२३ मध्ये त्याने बीसीसीआयची अंपायरिंग परीक्षा उत्तीर्ण केली आणि क्रिकेटमध्ये नव्या भूमिकेत पुनरागमन केलं. आता तो आयपीएलमध्ये अंपायर म्हणून काम करत आहे.

याच सामन्यात विराट आणि अर्गल पुन्हा एकदा एकाच मैदानावर दिसले. फरक इतकाच होता की, एक खेळाडू म्हणून मैदानात होता तर दुसरा अंपायरच्या भूमिकेत. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने अर्गलकडे जाऊन संवाद साधला. त्या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

विराटची आणखी एक ऐतिहासिक कामगिरी

या सामन्यात विराट कोहलीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएलमध्ये ९ हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यामुळे हा सामना विराटसाठी दुहेरी आनंद घेऊन आला. एकीकडे संघाचा मोठा विजय आणि दुसरीकडे जुन्या सहकाऱ्यासोबतचा भावनिक क्षण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT