FIFA World Cup 2026 Viking Row celebration : फिफा विश्वचषक २०२६ मधील रंगत आता चांगलीच वाढली आहे. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये बलाढ्य संघानी आपली आगेकूच कायम ठेवली आहे. विश्वचषकात नॉर्वे संघाची कामगिरी आतापर्यंत दमदार राहिली आहे. सेनेगलविरुद्ध ३-२ अशा अटीतटीच्या लढतीत विजय मिळवून बाद फेरीत (नॉकआउट स्टेज) धडक मारल्यानंतर, नॉर्वेच्या खेळाडूंनी मैदानावर बसून हे 'रोइंग' सेलिब्रेशन केले. फिफा विश्वचषक २०२६ मधून समोर आलेला हा सर्वात 'व्हायरल' ट्रेंड ठरला आहे. जाणून घेवूया 'वायकिंग रो' म्हणजे काय याविषयी...
नॉर्वेच्या खेळाडूंनी मैदानावर बसून हे 'रोइंग' सेलिब्रेशन केले; विश्वचषकादरम्यान चाहत्यांनी या सेलिब्रेशनला विशेष ओळख मिळवून दिली होती. १९९८ नंतर प्रथमच नॉर्वेचे चाहते लाल रंगाचे कपडे परिधान करून आले होते. सेनेगलविरुद्धच्या सामन्यानंतर मार्टिन ओडेगार्ड आणि अर्लिंग हॅलंड यांनी संपूर्ण संघाला चाहत्यांसमोर हे 'रोइंग' सेलिब्रेशन करण्यासाठी एकत्र केले. सोलबॅकन देखील धावत येत हालांडच्या मागे मध्यभागी बसले. यानंतर ओडेगार्डने ड्रम वाजवायला सुरुवात केली आणि या आनंदाचा सर्वोच्च क्षण सर्वांनी साजरा केला.यानंतर झालेले 'वायकिंग रो' सेलिब्रेशनचा व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
रिपोर्ट्सनुसार, फुटबॉल सामन्यानंतर झालेले सेलिब्रेशन नॉर्वेच्या पारंपारिक 'व्हायकिंग' संस्कृतीपासून प्रेरित आहे. बीबीसीच्या माहितीनुसार, "व्हायकिंग काळ साधारणपणे इसवी सन ७०० ते ११०० चा होता. अनेक व्हायकिंग्सनी स्कॅन्डिनेव्हियामधील आपली घरे सोडली. मोठ्या बोटीने ब्रिटन आणि आयर्लंडसारख्या इतर देशांमध्ये प्रवास केला. ब्रिटनमधील लोक या आक्रमकांना 'डेन्स' म्हणायचे, परंतु ते डेन्मार्कसोबतच नॉर्वे आणि स्वीडनमधूनही आले होते. व्हायकिंग्स समुद्रात प्रवास करून वस्तूंचा व्यापार करायचे. ते मायदेशी परतताना चांदी, रेशीम, मसाले, वाईन, दागिने, काच आणि मातीची भांडी खरेदी करून आणायचे. होडी वल्वण्याची ही कृती व्हायकिंग्सनी केलेल्या त्या ऐतिहासिक सागरी प्रवासाचा आदर करते आणि त्याचे प्रतीक आहे. हा नॉर्वेजियन ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे.
टीव्हीवरील दृश्यांमध्ये ट्रॉन्डहाइममधील चाहतेही या सेलिब्रेशनमध्ये सामील झाल्याचे दिसले, ज्याने जगभरातील नॉर्वेच्या समर्थकांना एकत्र आणले. मात्र, मध्यफळीतील पॅट्रिक बर्ग म्हणाला की, हा ट्रेंड इतका लोकप्रिय होईल असे त्याला वाटले नव्हते.सुरुवातीला लोकांना थोडी शंका होती की, हे सेलिब्रेशन लोकांच्या स्मरणात राहील का?पण आतापर्यंतच्या आमच्या विश्वचषकातील प्रवासाचा हा एक मोठा भाग बनला आहे."
सामन्यानंतर अलेक्झांडर सोर्लोथ म्हणाला, "हे खूपच मजेशीर होते. मला वाटले होते त्यापेक्षा खूप जास्त मजा आली. जेव्हा तुम्ही तो आवाज ऐकता, तेव्हा ते अगदी जादूई वाटते."हा 'व्हायकिंग रो' आणि त्याचा संघ विश्वचषकात कुठपर्यंत मजल मारेल, असे विचारले असता सोर्लोथने आत्मविश्वासाने उत्तर दिले."ते तर वेळच सांगेल, पण जर आपण आपली सर्वोत्तम कामगिरी केली, तर ही एक स्पर्धा आहे आणि इथे काहीही होऊ शकते. आम्ही आमच्या सर्वोच्च पातळीवर खेळलो, तर आम्ही खूप पुढे जाऊ शकतो," तो म्हणाला. नॉर्वे सध्या ६ गुणांसह ग्रुप 'I' मध्ये गोल फरकाच्या जोरावर फ्रान्सच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांमध्ये शुक्रवार, २६ जून रोजी ग्रुप स्टेजचा अंतिम सामना रंगणार आहे.