स्पोर्ट्स

WI vs PAK ODI : कॅरिबियन वादळात पाकिस्तानचा 92 धावांत सुपडासाफ! वेस्ट इंडीजचा 202 धावांनी अभूतपूर्व विजय

वेस्ट इंडीज संघाने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानचा 200 किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने पराभव केला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कधीही झाली नव्हती.

रणजित गायकवाड

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजने पाकिस्तानवर 202 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह, विंडीज संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक असा पराक्रम केला आहे, जो यापूर्वी कधीही घडला नव्हता. वनडे क्रिकेटच्या इतिहासात वेस्ट इंडीजने पाकिस्तानला 200 किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच, धावसंख्येच्या फरकाने मिळवलेला हा वेस्ट इंडीजचा चौथा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

2015 विश्वचषकात पाकिस्तानवर 150 धावांनी मिळवला होता विजय

यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध वेस्ट इंडीजचा सर्वात मोठा विजय 150 धावांचा होता. हा विजय त्यांनी 2015 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथे झालेल्या सामन्यात मिळवला होता. मात्र, ताज्या सामन्यात 202 धावांनी विजय नोंदवून वेस्ट इंडीजने 50 वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला आहे. दोन्ही संघांमध्ये 1975 सालापासून एकदिवसीय मालिका खेळवली जात असून, विंडीज संघाने प्रथमच पाकिस्तानविरुद्ध इतका मोठा विजय नोंदवला आहे.

नेदरलँड्सविरुद्ध वेस्ट इंडीजचा सर्वात मोठा विजय

वनडे क्रिकेटमध्ये धावसंख्येच्या फरकाने वेस्ट इंडीजचा सर्वात मोठा विजय 2011 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध नोंदवला गेला होता. त्या सामन्यात त्यांनी नेदरलँड्सचा 215 धावांनी पराभव केला होता. त्याखालोखाल, 2010 मध्ये किंग्स्टन येथे कॅनडावर 208 धावांनी, तर 2014 मध्ये हॅमिल्टन येथे न्यूझीलंडवर 203 धावांनी विजय मिळवला होता. हा वनडे क्रिकेटमधील त्यांचा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला विजय हा त्यांचा चौथा सर्वात मोठा विजय ठरला. तर, त्यांचा पाचवा सर्वात मोठा विजय 2025 साली आयर्लंडविरुद्ध नोंदवला गेला होता, ज्यामध्ये त्यांनी आयर्लंडचा 197 धावांनी पराभव केला होता.

वनडे क्रिकेटमध्ये धावसंख्येच्या फरकाने विंडीजचे सर्वात मोठे विजय

215 धावा - विरुद्ध नेदरलँड्स (2015, दिल्ली)

208 धावा - विरुद्ध कॅनडा (2010, किंग्स्टन)

203 धावा - विरुद्ध न्यूझीलंड (2014, हॅमिल्टन)

202 धावा - विरुद्ध पाकिस्तान (2025, त्रिनिदाद)

197 धावा - विरुद्ध आयर्लंड (2025, डब्लिन)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT