Kapil Dev on Virat Kohli Test Retirement Pudhari
स्पोर्ट्स

Kapil Dev on Virat Kohli: '10 वर्षांनंतर विराट कोहलीला पश्चात्ताप होईल'; कपिल देव यांच्या विधानाने खळबळ, नेमकं काय म्हणाले?

Kapil Dev on Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन मोठी चूक केली, असे मत माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.

Rahul Shelke

Kapil Dev on Virat Kohli Test Retirement: दिग्गज फलंदाज विराट कोहलीने १२ मे २०२५ रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जवळ आली असताना विराटने घेतलेल्या या निर्णयाने क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला होता. आता भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विराटच्या निवृत्तीबाबत पुन्हा एकदा आपले मत मांडले आहे. विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घाईत घेतला. दहा वर्षांनंतर त्याला या निर्णयाचा नक्कीच पश्चात्ताप होईल, असे स्पष्ट मत कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.

१० वर्षांनंतर विराटला निर्णयाचा पश्चात्ताप होईल

'मिड-डे'च्या वृत्तानुसार, कपिल देव यांच्या मते विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी चूक केली आहे. विराट जेव्हा दहा वर्षांनंतर आपल्या या निर्णयाचा विचार करेल, तेव्हा त्याला नक्कीच पश्चात्ताप होईल, असे त्यांनी म्हटले.

विराटकडे अजूनही उत्कृष्ट फिटनेस आहे. त्याची शारीरिक क्षमता इतर अनेक खेळाडूंपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे तो आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकला असता, असे कपिल देव यांना वाटते. एवढेच नाही, तर या वयातही तो २५ वर्षांच्या तरुण खेळाडूला मैदानावर टक्कर देऊ शकला असता, असेही त्यांनी सांगितले.

रागाच्या भरात निवृत्ती घेणे योग्य नाही

विराटच्या निवृत्तीच्या निर्णयावर बोलताना कपिल देव यांनी रागाच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये, असा सल्लाही दिला. त्यांच्या मते, विराटने माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी होती.

मोहिंदर अमरनाथ यांना अनेकदा भारतीय संघातून वगळण्यात आले होते. मात्र, त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक वेळी जोरदार पुनरागमन करून टीकाकारांना चुकीचे ठरवले. विराटनेही अशाच प्रकारे परिस्थितीचा सामना करायला हवा होता, असे कपिल देव यांनी म्हटले.

विराट कोहलीची कसोटी कारकीर्द कशी राहिली?

विराट कोहलीने भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहे. तो भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने आपल्या १२३ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ९,२३० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३० शतकांचा समावेश आहे.

रोहित शर्माच्या भवितव्याबाबत कपिल देव काय म्हणाले?

कपिल देव यांनी यावेळी रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीवरही भाष्य केले. विराट कोहलीप्रमाणेच रोहित शर्माही आता केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत आहे. त्याच्या भवितव्याबाबत बोलताना कपिल देव म्हणाले की, रोहित खेळू शकत असेल तर त्याने खेळत राहणे चांगले आहे. मात्र, निवड समितीने एखादा निर्णय घेतला, तर त्याच्या कारकिर्दीचा शेवट होऊ शकतो.

भारतीय क्रिकेटच्या हिताचा निर्णय निवड समिती घेईल. त्यामुळे हा विषय त्यांच्यावर सोडलेला बरा, असेही कपिल देव यांनी स्पष्ट केले.

रोहित शर्माने अनेक वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. मात्र, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, एमएस धोनी आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनाही एक दिवस निवृत्ती घ्यावी लागली.

त्याचप्रमाणे रोहितच्या कारकिर्दीचाही एक दिवस शेवट होणार आहे, असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले. विराट कोहलीच्या निवृत्तीवर कपिल देव यांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT