बंगळूर : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यांचा समावेश 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेसाठी दिल्लीच्या संभाव्य संघात करण्यात आला आहे. कोहलीने दिल्ली क्रिकेट असोसिएशनला (डीसीए) आपण खेळणार असल्याचे कळविले आहे.
तो तब्बल 15 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने या स्पर्धेत शेवटचा सहभाग 2010 मध्ये सर्व्हिसेसविरुद्धच्या सामन्यात घेतला होता. कोहलीने या हंगामात यापूर्वी दिल्लीकडून रणजी ट्रॉफीचे सामनेही खेळले आहेत. कोहली आणि रोहित शर्मा (दोघे टेस्ट आणि टी-20 मधून निवृत्त झाले आहेत) आता केवळ एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत.
बीसीसीआयने सर्व तंदुरुस्त खेळाडूंना, जे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत व्यस्त नाहीत, त्यांना देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशामुळेच कोहलीचा समावेश निश्चित झाला आहे. कोहली 2027 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकावर लक्ष ठेवून आहे, ज्यासाठी त्याला 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये आपली लय कायम ठेवायची आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीने दोन शतके आणि एक नाबाद अर्धशतकासह 302 धावा केल्या, तसेच ‘प्लेअर ऑफ द सीरिज’चा पुरस्कार पटकावला.जागतिक क्रमवारी : 2025 मध्ये 13 एकदिवसीय सामन्यांत 651 धावांसह कोहली सध्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.