Virat Kohli Eyes Another Milestone Just 25 Runs Away from Historic Feat
बडोदा : भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) आता केवळ वन डे क्रिकेट खेळत असून यामुळे त्याच्या एकेक लढतीबद्दल कमालीची उत्सुकता असते. आता हा दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार धावांचा माईलस्टोन सर करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आणखी 25 धावा जमवल्यानंतर तो या मांदियाळीत दाखल होईल.
न्यूझीलंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये विराटने 33 डावांत 55.23 च्या सरासरीने 1,657 धावा केल्या आहेत. यात 6 शतके, 9 अर्धशतके आणि नाबाद 154 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. तो 28,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यापासून केवळ 25 धावा दूर आहे. सध्या 556 सामन्यांतील 623 डावांत 84 शतके आणि 145 अर्धशतकांसह 52.58 च्या सरासरीने 27,975 धावा त्याच्या नावावर आहेत. नाबाद 254 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लवकरच तो भारतीय आयकॉन सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्या पंक्तीत सामील होण्याची शक्यता आहे.
आता केवळ वन डे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणाऱ्या विराटने, डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यांत 151.00 च्या सरासरीने 302 धावा काढत ‘प्लेअर ऑफ द सीरिज’चा पुरस्कार पटकावला होता. यामध्ये त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर, डिसेंबरच्या अखेरीस विराटने 15 वर्षांनंतर विजय हजारे करंडक (तकढ) स्पर्धेत दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. आंध्र प्रदेशविरुद्ध 131 आणि गुजरातविरुद्ध 77 धावा काढताना तो नेहमीप्रमाणेच प्रभावी दिसला होता.
सध्या विराट मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त लयीत आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन लागोपाठच्या शून्यानंतर, मागील सहा सामन्यांत त्याने 146 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यात 3 शतकेही समाविष्ट आहेत. 2025 मध्ये विराट 651 धावांसह भारतासाठी सर्वाधिक वन डे धावा काढणारा फलंदाज ठरला. 13 सामन्यांत 65.10 च्या सरासरीने त्याने हे यश मिळवले. यात 3 शतके, 4 अर्धशतके आणि 135 ही सर्वोत्तम धावसंख्या होती. त्याचा स्ट्राईक रेट 96 हून अधिक होता.
भारतीय फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ ठरलेला विराट इन्स्टाग्रामवर बराच सक्रिय राहत आला असून बडोदा येथील सराव सत्राचे काही फोटोही त्याने यावेळी शेअर केले आहेत. यात त्याच्यासोबत के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणा दिसत आहेत.