विराट कोहली 
स्पोर्ट्स

Virat Kohli World Record : कोहलीचा चिन्नास्वामी स्टेडियमवर 3500 धावांचा ‘विराट’ पाऊस! बनला जगातील एकमेव फलंदाज

Virat Kohliने बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 105 डावांमध्ये 3500 धावा केल्या.

रणजित गायकवाड

Virat Kohli World Record 3500 T20 runs at M Chinnaswamy Stadium

बेंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा माजी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) गुरुवारी (दि. 24) इतिहास रचला. आयपीएल 2025 चा 42 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 14 धावा काढताच 3500 धावा पूर्ण केल्या. तो एकाच मैदानावर 3500 टी-20 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. विराटने 42 चेंडूत 70 धावांची खेळी केली. या डावात त्याने 8 चौकार आणि 2 षटकारही मारले.

रहीम दुसऱ्या क्रमांकावर

बांगलादेशचा यष्टीरक्षक मुशफिकुर रहीम टी-20 मध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर 3373 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर जेम्स विन्स आहे, ज्याने साउथहॅम्प्टनच्या द रोझ बाउलमध्ये 3253 धावा केल्या. यादीत चौथ्या क्रमांकावर अ‍ॅलेक्स हेल्स आहे. हेल्सने नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे टी-20 मध्ये 3241 धावा केल्या आहेत. बांगलादेशचा तमीम इक्बाल या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर 3238 धावा केल्या आहेत.

टी-20 मध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक धावा

  • विराट कोहली : 105 इनिंग : 3500* (एम. चिन्नास्वामी स्टेडियम)

  • मुशफिकुर रहीम : 136 इनिंग : 3373 (शेरे बांगला नॅशनल स्टेडियम)

  • जेम्स विन्स : 106 इनिंग : 3253 (द रोझ बाउल, साउथहॅम्प्टन)

  • अ‍ॅलेक्स हेल्स : 109 इनिंग : 3241 (ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम)

  • तमिम इक्बाल : 110 इनिंग : 3238 (शेरे बांगला नॅशनल स्टेडियम)

T20 मध्ये प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक 50+ धावा

  • 62 : विराट कोहली*

  • 61 : बाबर आझम

  • 57 : ख्रिस गेल

  • 55 : डेव्हिड वॉर्नर

  • 52 : जोस बटलर

विराटची बॅट तळपते आहे

आयपीएल 2025 मध्ये विराट कोहली उत्तम लयीत दिसत आहे. काही सामने वगळता तो सातत्याने सामना जिंकणाऱ्या खेळी खेळत आहे. या हंगामातील कोलकाताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात विराटने 59 धावांची नाबाद खेळी केली होती. यानंतर, त्याने पुढील 2 सामन्यांमध्ये 31 आणि 7 धावा केल्या. कोहलीने मुंबई इंडियन्सविरुद्ध 67 धावांची खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पुढच्याच सामन्यात विराटने 22 धावा केल्या.

विराटने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद 62 धावा केल्या होत्या. तथापि, पंजाब किंग्जविरुद्ध त्याची बॅट शांत राहिली. त्याला फक्त 1 धाव करता आली. आरसीबीच्या माजी कर्णधाराने पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 73* धावा केल्या होत्या. आता पुन्हा त्याने राजस्थान विरुद्ध विजयी अर्धशतकी खेळी साकारली आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमवर 4 शतके

कोहलीचे चिन्नास्वामी स्टेडियमशी नाते धावा आणि विक्रमांच्यापलीकडेचे आहे. ही निष्ठा आणि सातत्यावर आधारित प्रेमकथा आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून (2008) प्रत्येक हंगामात एकाच फ्रँचायझीसाठी (आरसीबी) खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. आरसीबीच्या या स्टार खेळाडूने एम. चिन्नास्वामी या घरच्या मैदानावर अनेक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. त्याने आयपीएलमधील 8 पैकी 4 शतके याच मैदानावर झळकवली आहेत.

धावांची भूक अजूनही जिवंत

चढ-उतार-, निराशा, पराक्रम यांच्या माध्यमातून कोहली आणि चिन्नास्वामी स्टेडियमचे बंधन कायम वृद्धिंगत होत आहे. जेव्हा जेव्हा तो या मैदानावर फलंदाजीसाठी उतरतो, तेव्हा एक उत्साह, काहीतरी खास घडण्याची आशा निर्माण होते. बहुतांश वेळा तो ती अपेक्षा पूर्ण करतो. 36 वर्षीय हा मास्टर खेळाडू आयपीएल 2025 मध्ये पुन्हा लयीत येत आहे. त्याची धावांची भूक अजूनही जिवंत असल्याचे त्याने दाखवून दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT