RCB vs RR : आरसीबीचा ‘चिन्नास्वामी’वर पहिला विजय

राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा जिंकता जिंकता हरले
Josh Hazlewood’s death‑over masterclass delivers RCB’s first Chinnaswamy win
हेझलवूडच्या १९ व्या षटकात त्याने फक्त एक धाव दिली आणि दोन विकेट घेतल्याने आरसीबीने विजय मिळवला.Pudhari File Photo
Published on
Updated on

बंगळूर; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या 42 व्या सामन्यात गुरुवारी (24 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू-राजस्थान रॉयल्स या दोन रॉयल संघांतील लढतीत आरसीबीने राजस्थानला 11 धावांनी पराभूत केले. यंदाच्या हंगामातील हा बंगळूरचा होम ग्राऊंड एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील पहिला विजय आहे. याआधी या हंगामात या मैदानात झालेल्या तिन्ही सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच बंगळूरचा हा 9 सामन्यांतील 6 वा विजयदेखील ठरला. त्यामुळे त्यांचे आता 12 गुण झाले असून, त्यांनी पॉईंटस् टेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांनी मुंबई इंडियन्सला चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे. (RCB vs RR)

गुरुवारी झालेल्या सामन्यात बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला 20 षटकांत 9 बाद 194 धावाच करता आल्या. बंगळूरकडून जोश हेझलवूडची गोलंदाजी सर्वोत्तम ठरली. बंगळूरसाठी तो विजयाचा हिरोही ठरला, त्याच्या शेवटच्या षटकांत सामना आरसीबीच्या बाजूने फिरला.

राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी यांनी सलामीला सुरुवात केली. जैस्वालने डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्याच्यात आणि सूर्यवंशीमध्ये चांगली भागीदारी होत होती. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली; पण 5 व्या षटकात सूर्यवंशीला भुवनेश्वर कुमारने बाद केले. सूर्यवंशीने 12 चेंडूंत 2 षटकारांसह 16 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर जैस्वाल नितीश राणासह डाव पुढे नेत होता; पण त्याला अर्धशतकासाठी एकाच धावेची गरज असताना जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर तो रोमारियो शेफर्डच्या हातून झेलबाद झाला. त्याने तुफानी फलंदाजी करताना 7 चौकार आणि 3 षटकारांसह 19 चेंडूंत 49 धावांची खेळी केली. तरी राजस्थानचा कर्णधार रियान परागने नंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत आक्रमक फटके खेळत संघाची धावगती आणखी वाढवली होती. मात्र, त्याला फार काळ कृणाल पंड्याने टिकू दिले नाही. कृणालने 10 व्या षटकात पहिल्याच चेंडूवर रियानला माघारी धाडले. नंतर नितीश राणाही 14 व्या षटकात बाद झाल्याने सामन्यात रोमांच आला होता. नितीशने 22 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकारासह 28 धावा केल्या. तरी नंतर ध्रुव ज्युरेलला शिमरॉन हेटमायर साथ देत होता. मात्र, जोश हेझलवूडने गोलंदाजी केलेले 17 वे षटक महत्त्वपूर्ण ठरले. त्याने शिमरॉन हेटमायरला बाद करत या षटकात 6 धावांच दिल्या. (RCB vs RR)

18 चेंडूंत 40 धावा असे काहीसे अवघड समीकरण असताना ध्रुव ज्युरेल आणि शुभम दुबे यांनी भुवनेश्वरकुमारच्या षटकात 22 धावा केल्या त्यामुळे 12 चेंडूंत 18 धावा असे सोपे समीकरण राजस्थानसाठी उरले होते. मात्र, 19 वे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. हेझलवूडच्या पहिल्या चेंडूवर ‘कहानी में ट्विस्ट’ आला. हेझलवूडचा ऑफस्टम्प बाहेरील चेंडू मारताना ज्युरेलच्या बॅटचा मागील भाग चेंडूला लागला. हेझलवूडने अपील केले नाही. परंतु, यष्टिरक्षक जितेश शर्मा झेल घेतल्याबद्दल ठाम होता, म्हणून ‘डीआरएस’ घेतला असता ज्युरेल या चेंडूवर बाद असल्याचे दिसले. ज्युरेलने 34 चेंडूंत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावा केल्या. त्याने पुढच्या चेंडूवर जोफ्रा आर्चरला शून्यावर बाद केले. 20 व्या षटकात 17 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर यश दयालने शुभम दुबेला बाद केले. दुबेने 7 चेंडूंत 12 धावा केल्या. याच षटकात वानिंदू हसरंगाही 1 धावेवर धावबाद झाला. शेवटी तुषार देशपांडे 1 धावेवर आणि फझलहक फारुकी 2 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. बंगळूरकडून विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी 95 धावांची भागीदारी करताना अर्धशतकेही केली. विराटने 42 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 70 धावांची खेळी केली. पडिक्कलने 27 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 50 धावांची खेळी केली. तसेच फिल सॉल्टने 26, टीम डेव्हिडने 23 आणि जितेश शर्माने नाबाद 20 धावांच्या छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. राजस्थानकडून संदीप शर्माने सर्वाधिक 2 विकेटस् घेतल्या. जोफ्रा आर्चर आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news