Virat Kohli file photo
स्पोर्ट्स

Virat Kohli: कोहलीचा संयम सुटला; हेल्मेट आणि ग्लोव्हज फेकले, पाहा वानखेडेवर नेमकं काय घडलं!

Mumbai Indians vs RCB IPL 2026 highlights: वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात बेंगळुरूने विजय तर मिळवला, मात्र या विजयापेक्षा सध्या विराट कोहलीच्या आक्रमक रूपाचीच चर्चा अधिक रंगली आहे.

मोहन कारंडे

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने विजय तर मिळवला, मात्र या विजयापेक्षा सध्या विराट कोहलीच्या आक्रमक रूपाचीच चर्चा अधिक रंगली आहे. अर्धशतकी खेळी करून बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना विराटने आपला संताप अनावर होऊन हेल्मेट आणि ग्लोव्हज फेकून दिले. विराटाच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित २० षटकांत ४ बाद २४० धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर फिल सॉल्टने अवघ्या ३६ चेंडूत ७८ धावांची तुफानी खेळी केली. त्याला विराट कोहलीने (३८ चेंडूत ५० धावा) चोख साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारने केवळ २० चेंडूत ५३ धावा कुटत धावगती कायम राखली. अखेरच्या षटकांत टिम डेव्हिडने १६ चेंडूत नाबाद ३४ धावा फटकावून संघाला २४० धावांपर्यंत पोहोचवले.

कोहली का संतापला?

विराटने या हंगामातील आपले दुसरे अर्धशतक केले होते आणि तो मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र, हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. चांगल्या लयीत असतानाही बाद झाल्यामुळे विराट स्वतःवर कमालीचा नाराज दिसला. मैदानातून बाहेर जाताना त्याने रागाच्या भरात आपले हेल्मेट आणि ग्लोव्हज फेकून दिले. मैदानावर नेहमीच आक्रमक असणाऱ्या विराटचा हा 'रुद्र अवतार' पाहून चाहतेही अवाक झाले.

२४१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली होती, मात्र मोक्याच्या क्षणी आरसीबीचा फिरकीपटू सुयश शर्माने आठव्या षटकात दोन बळी घेत मुंबईला बॅकफूटवर ढकलले. मुंबईचा डाव ५ बाद २२२ धावांवर आटोपला आणि आरसीबीने १८ धावांनी विजय संपादन केला.

गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने या हंगामात आतापर्यंत ४ पैकी ३ सामने जिंकले असून केवळ एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. त्यांचा पुढील सामना १५ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT