

गुवाहाटी; वृत्तसंस्था : आयपीएलमध्ये शुक्रवारी गुवाहाटीत झालेला सामना गाजवला तो राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने. वरुणराजा बरसल्यानंतर उशिरा सुरू झालेल्या या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (आरसीबी) विजयासाठी दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाने 6 गडी राखून लिलया विजय मिळवला. वैभव सूर्यवंशीने आरसीबीच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसे काढत 26 चेंडूंत 8 चौकार आणि 7 गगनभेदी षटकारांसह 78 धावांची स्फोटक खेळी केली. वैभवने केवळ 15 चेंडूंत 50 धावा पूर्ण केल्या. वैभवने ध्रुव ज्युरेलच्या साथीने दुसर्या गड्यासाठी केवळ 34 चेंडूंत 100 धावांची भागीदारी करून आरसीबीला बॅकफूटवर ढकलले. ज्युरेलने नाबाद 81 धावांची खेळी साकारली.
विजयासाठी 202 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (13) स्वस्तात बाद झाला. त्याने 8 चेंडूंत 2 षटकार मारले. त्यानंतर वैभव सूर्यवंशीने संपूर्ण खेळाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याचा स्ट्राईक रेट 300 च्या आसपास राहिला. वैभवने ध्रुव जुरेलसोबत दुसर्या गड्यासाठी 108 धावांची जलद भागीदारी करून विजयाचा पाया रचला. कुणाल पंड्याच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात वैभव झेलबाद झाला. वैभव बाद झाल्यानंतर ध्रुव ज्युरेलने खिंड लढवली. त्याने 43 चेंडूंत नाबाद 81 धावांची खेळी केली. ज्युरेलने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार लगावत राजस्थानला 12 चेंडू राखून विजय मिळवून दिला. त्याला अनुभवी रवींद्र जडेजाने (24 नाबाद) सुरेख साथ दिली.
पहिल्याच चेंडूवर बसला धक्का
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा राजस्थानचा निर्णय जोफ्रा आर्चरने सार्थ ठरवला. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला शून्यावर बाद करून आरसीबीला मोठा धक्का दिला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल (14) आणि धडाकेबाज सुरुवात करणारा विराट कोहली (32 धावा, 16 चेंडू) हेदेखील स्वस्तात माघारी परतले. पाठोपाठ कृणाल पंड्या, जितेश शर्मा आणि टीम डेव्हिड बाद झाल्याने आरसीबीची अवस्था 11 व्या षटकात 6 बाद 94 अशी बिकट झाली होती.
कर्णधार पाटीदारची कॅप्टन इनिंग
एका बाजूला विकेटस् पडत असताना कर्णधार रजत पाटीदारने संयमी फलंदाजी करत डाव सावरला. त्याने 35 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. 17 व्या षटकात रवी बिश्नोईला दोन सलग षटकार खेचत पाटीदारने आक्रमक रूप धारण केले. त्याने 40 चेंडूंत 63 धावांची (4 चौकार, 4 षटकार) खेळी करून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
वेंकटेश अय्यरचा इम्पॅक्ट
पाटीदार बाद झाल्यानंतर वेंकटेश अय्यरने मैदानाचा ताबा घेतला. त्याने केवळ 15 चेंडूंत नाबाद 29 धावांची खेळी केली. विशेषतः डावाच्या अखेरच्या षटकात आरसीबीने 21 धावा वसूल केल्या, ज्यामुळे संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. रोमारिओ शेफर्डनेही 22 धावांचे योगदान दिले राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 3 षटकांत 33 धावा देत 2 बळी घेतले, तर रवी बिश्नोईने 32 धावांत 2 आणि युवा ब्रिजेश शर्माने 37 धावांत 2 गडी बाद केले.