RCB vs SRH | देवदत्तचे तुफान, विराटचा क्लासिक टच; हैदराबादवर 6 गडी राखून दणकेबाज विजय

आरसीबीचा सलामीलाच धमाका
RCB vs SRH |
RCB vs SRH | देवदत्तचे तुफान, विराटचा क्लासिक टच; हैदराबादवर 6 गडी राखून दणकेबाज विजय
Published on
Updated on

बेंगळूर; वृत्तसंस्था : येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी रंगलेल्या आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाने सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) संघावर 6 गडी आणि 26 चेंडू बाकी ठेवत दणकेबाज विजयाची नोंद केली. आरसीबीच्या या धमाकेदार विजयी सलामीत देवदत्त पडिक्कलची तुफानी खेळी आणि विराट कोहलीचा क्लासिक टच मोलाचा ठरला. देवदत्तने केवळ 26 चेंडूंत 7 चौकार 4 षटकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी साकारली. विशेष म्हणजे देवदत्तने 21 चेंडूंत अर्धशतक झळकविले. विराट कोहलीने 38 चेंडूंत नाबाद 69 धावा करत आपल्या क्लासिक टचची झलक दाखविली. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार इशान किशनने केवळ 38 चेंडूंत केलेली 80 धावांची खेळी व्यर्थ ठरली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या हैदराबाद संघाने 20 षटकांत 9 बाद 201 धावा काढत आरसीबीला विजयासाठी 202 धावांचे आव्हान दिले. आरसीबीने विजयाचे विशाल लक्ष्य केवळ 15.4 षटकांत गाठून आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले. ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून जेकब डफीच्या जागी मैदानात आलेल्या देवदत्त पडिक्कलने केवळ 21 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने 61 धावांच्या (26 चेंडू) खेळीत चौफेर फटकेबाजी करत 7 चौकार आणि 4 षटकार मारले. किंग कोहलीने 38 चेंडूंत नाबाद 69 धावा करत आरसीबीला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार खेचले. रजत पाटीदारने 12 चेंडूंत 2 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने 31 धावांची जलद खेळी साकारली. जितेश शर्मा शून्यावर बाद झाला. टीम डेव्हिड 16 धावांवर नाबाद राहिला. हैदराबाद संघाकडून डेव्हिड पेनने 2 तर उनाडकट आणि दुबेने प्रत्येकी 1 बळी घेतला.

तत्पूर्वी, हैदराबादचा कर्णधार इशान किशनने वादळी खेळी करत आरसीबीची गोलंदाजी फोडून काढली. त्याने केवळ 38 चेंडूंत 80 धावा काढल्या. त्यात 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. इशानने हेन्रिक क्लासेनसह भागीदारी करत संघाचा डाव सावरला. क्लासेनने 22 चेंडूंत 2 चौकार 1 षटकारासह 31 धावा केल्या.

आरसीबीने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामन्याच्या प्रारंभीच आरसीबीचा गोलंदाज जेकब डफी याने सुरुवातीला हैदराबादला तीन मोठे धक्के दिले होते. त्याने ट्रॅव्हिस हेड (11), अभिषेक शर्मा (7) आणि नितीश रेड्डी (1) यांना स्वस्तात बाद करून हैदराबादची अवस्था 3 बाद 29 अशी केली होती. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर कर्णधार इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन यांनी डाव सावरला. या दोघांनी चौफेर फटकेबाजी करत चौथ्या विकेटसाठी दमदार भागीदारी केली. कर्णधार इशान किशनने केवळ 27 चेंडूंत 50 धावा पूर्ण केल्या. क्लासेन 31 धावांवर शेफर्डच्या चेंडूवर सॉल्टकडे झेल देऊन बाद झाला. इशान किशनला अभिनंदन सिंगने बाद केले. सॉल्टने इशानचा अवघड झेल टिपून त्याची वादळी खेळी संपुष्टात आणली. अनिकेत वर्माने फटकेबाजी करताना केवळ 18 चेंडूंत 43 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार, 4 षटकार मारले.आरसीबीकडून जेकब डफीने 3, रोमारिओ शेफर्डने 3 गडी बाद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news