vijay hazare trophy shreyas iyer appointed captain of the mumbai team
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय (ODI) मालिकेत सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीवर खिळल्या असतानाच, देशांतर्गत क्रिकेटमधून त्याच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतीच न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या मालिकेत शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून श्रेयस अय्यरची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
विजय हजारे ट्रॉफी या प्रतिष्ठित ५० षटकांच्या देशांतर्गत स्पर्धेसाठी मुंबई संघाच्या कर्णधारपदी अचानक बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत या स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व सांभाळणारा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर याच्याकडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) ५ जानेवारी रोजी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून या बदलाची माहिती दिली. एमसीएने म्हटले आहे की, ‘विजय हजारे ट्रॉफीच्या उर्वरित साखळी सामन्यांसाठी श्रेयस अय्यरची मुंबईच्या कर्णधारपदी नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे.’ शार्दुल ठाकूर बाहेर पडल्यानंतर संघ व्यवस्थापनाने अय्यरच्या अनुभवावर विश्वास दाखवला आहे. श्रेयसकडे आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील नेतृत्वाचा दांडगा अनुभव असून, त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचा संघ महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आपली पकड मजबूत करेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
साखळी फेरीनंतर अय्यर मुंबईचे कर्णधारपद भूषवणार की नाही, हे बीसीसीआयच्या निर्णयावर अवलंबून असेल. न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ११ जानेवारीपासून बडोदा येथे सुरू होत आहे आणि या मालिकेसाठी अय्यरची भारतीय संघात निवड झाली आहे.
बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, श्रेयस अय्यरच्या फिटनेसची चाचणी 'सेंटर ऑफ एक्सीलेंस' (CoE) मध्ये केली जाईल. तिथे त्याला तंदुरुस्त घोषित केल्यास तो राष्ट्रीय संघात सामील होईल. जर त्याला आंतरराष्ट्रीय पुनरागमनासाठी परवानगी मिळाली, तर १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीसाठी मुंबईला नवीन कर्णधाराची निवड करावी लागेल. यावर बोलताना एमसीएचे सचिव उन्मेश खानविलकर म्हणाले, ‘स्थिती स्पष्ट झाल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. सध्या श्रेयस उर्वरित दोन साखळी सामन्यांत संघाचे नेतृत्व करेल.’