

भारतीय फलंदाजीचा कणा असलेला विराट कोहली आता न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत मैदानात उतरणार आहे. या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत विराटने आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला होता.
विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानात पाऊल ठेवतो, तेव्हा त्याच्या नजरेसमोर एखादा नवा विक्रम नक्कीच असतो. ११ जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत विराटला एका ऐतिहासिक टप्प्याला गवसणी घालण्याची संधी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याचा मान विराटला मिळू शकतो. सध्या तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. पाँटिंगने ३३५ सामन्यांत ४२.४८ च्या सरासरीने १२,६६२ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, विराट कोहलीने आतापर्यंत २४४ सामन्यांतील २४१ डावांमध्ये ६१.२६ च्या उत्कृष्ट सरासरीने १२,४३६ धावा केल्या आहेत.
त्यामुळे रिकी पाँटिंगचा हा 'विराट' विक्रम मोडीत काढण्यासाठी कोहलीला आता केवळ २२७ धावांची आवश्यकता आहे. या यादीत श्रीलंकेचा कुमार संगकारा तिसऱ्या स्थानी असून त्याने २४३ सामन्यांत ९,७४७ धावा केल्या आहेत.
विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने तिन्ही सामन्यांत ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. पहिल्या दोन सामन्यांत त्याने शतके झळकावली, तर तिसऱ्या सामन्यात ६५ धावांवर तो नाबाद राहिला. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने आपला दबदबा कायम राखत आंध्र प्रदेशविरुद्ध १३१ आणि गुजरातविरुद्ध ७७ धावा केल्या. विराटची सध्याची लय पाहता, तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पाँटिंगला सहज मागे टाकेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका ११ ते १८ जानेवारी दरम्यान रंगणार आहे:
पहिला सामना : ११ जानेवारी (वडोदरा)
दुसरा सामना : १४ जानेवारी (राजकोट)
तिसरा सामना : १८ जानेवारी (इंदूर)
एकदिवसीय मालिकेनंतर २१ ते ३१ जानेवारी दरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे, ज्यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे.