

T20 World Cup 2026 Bangladesh squad hindu cricketer Litton Das captain
ढाका : टी-२० विश्वचषक २०२६ च्या पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) एक अत्यंत अनपेक्षित आणि मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या निर्देशानंतर मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर पडावे लागल्याने निर्माण झालेल्या वादाच्या सावटात, बांगलादेशने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व लिटन दास याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुस्तफिजूर रहमानला रिलीज केल्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डला झटका बसला आहे. शनिवारी बोलावलेल्या आणीबाणीच्या बैठकीत बीसीबीने मोठा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, बांगलादेशला त्यांचे विश्वचषकातील सामने भारतात खेळण्याची इच्छा नाही. त्यांनी आयसीसीकडे (ICC) मागणी केली आहे की, त्यांचे सर्व सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्यात यावेत. मात्र, बीसीसीआयने हॉटेल बुकिंग आणि नियोजित वेळापत्रकाचे कारण देत बदलास नकार दिला आहे.
बांगलादेशमध्ये अलीकडच्या काळात हिंदू अल्पसंख्याकांवर झालेल्या अत्याचाराच्या बातम्यांमुळे वातावरण तापलेले असतानाच, क्रिकेट बोर्डाने एका हिंदू क्रिकेटपटूला कर्णधार बनवून सर्वांना चकित केले आहे.
लिटन दासने आतापर्यंत २९ टी-२० सामन्यांत बांगलादेशचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी १५ सामन्यांत संघाने विजय मिळवला आहे. दिनाजपूर येथे जन्मलेला लिटन हा आपल्या 'स्टायलिश' आणि 'विस्फोटक' फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो एक कट्टर हिंदू असून सोशल मीडियावर सण साजरे करतानाचे फोटो नेहमीच शेअर करत असतो.
लिटन दास हा केवळ कर्णधारच नाही, तर बांगलादेशचा सर्वात भरवशाचा फलंदाज आहे. त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत.
वनडे : ९५ सामन्यांत ५ शतकांसह २५६९ धावा. (झिम्बाब्वेविरुद्ध १७६ धावांची ऐतिहासिक खेळी).
टी-२० : १२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १६ अर्धशतकांसह २६५५ धावा.
एकूण टी-२० : २६० सामन्यांत जवळपास ६००० धावा आणि १ शतक.
लिटन दास (कर्णधार), मोहम्मद सैफ हसन (उपकर्णधार), तंजीद हसन, मोहम्मद परवेज हुसैन इमोन, तौहीद हृदोय, शमीम हुसैन, काजी नुरुल हसन सोहन, शक महेदी हसन, रिशद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजूर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, मोहम्मद शैफुद्दीन आणि शोरफुल इस्लाम.
बांगलादेशचा समावेश 'ग्रुप सी' मध्ये असून त्यांचे तीन सामने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आणि एक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
एकीकडे मैदानाबाहेरील राजकीय आणि प्रशासकीय तणाव, तर दुसरीकडे विश्वचषकाचे रणशिंग अशा दुहेरी कात्रीत बांगलादेशचा संघ अडकला आहे. आता लिटन दासच्या नेतृत्वाखाली हा संघ भारतात कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष लागले आहे.