स्पोर्ट्स

Vijay Hazare Trophy : ‘कोहली’च्या सामन्यासाठी ‘चाहत्यांचा’ पत्ता कट! बेंगळुरू संतापाची लाट, रिकाम्या स्टेडियममध्ये रंगणार दिल्लीची लढत

Virat Kohli Domestic Cricket : कर्नाटक सरकारच्या सूचनेनुसार हा बदल करण्यात आला

रणजित गायकवाड

बेंगळुरू : भारताची प्रतिष्ठित घरगुती ५० षटकांची स्पर्धा 'विजय हजारे ट्रॉफी' बुधवारपासून (२४ डिसेंबर) सुरू होत आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली देखील सामील झाला असून तो दिल्ली संघाचा भाग आहे. ब-याच वर्षांनी तो ही स्पर्धा खेळताना दिसणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, सामना सुरू होण्याला २४ तासांहून कमी वेळ शिल्लक असताना, कर्नाटक सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

चिन्नास्वामी नाही, आता 'या' मैदानावर होणार सामने

मिळालेल्या माहितीनुसार, चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारे दिल्लीचे सर्व सामने आता बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) स्टेडियममध्ये हलवण्यात आले आहेत. कर्नाटक सरकारच्या सूचनेनुसार हा बदल करण्यात आला असून, सुरक्षेच्या कारणास्तव चिन्नास्वामी स्टेडियममधील सामने शिफ्ट करण्याचा निर्णय क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.

मैदानात 'नो एन्ट्री'; विराटला पाहता येणार नाही

चाहत्यांसाठी सर्वात मोठा झटका म्हणजे, ज्या COE स्टेडियममध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत, तिथे प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजेच, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मैदानात जाऊन पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार नाही. हे सामने प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जातील.

गर्दीचे टेन्शन कारणीभूत?

नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात जेव्हा विराट कोहली दिल्लीकडून मैदानात उतरला होता, तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. बेंगळुरूमध्येही तशीच परिस्थिती निर्माण होऊन सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो अशी भीती तेथील राज्य सरकार आहे. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून चिन्नास्वामी स्टेडियमवरील सामना दुसरीकडे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

दिल्लीच्या संघाचे वेळापत्रक

दिल्लीचा संघ बुधवारी आपला पहिला सामना खेळणार असून, त्यांचे आगामी सामने खालीलप्रमाणे असतील.

  • २४ डिसेंबर : विरुद्ध आंध्र प्रदेश : COE स्टेडियम

  • २६ डिसेंबर : विरुद्ध गुजरात : COE स्टेडियम

ऐनवेळी निर्णय, खेळाडूंचीही धावपळ

कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या (KSCA) एका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बोर्डाला या निर्णयाची माहिती मंगळवारी (दि. २३) सकाळीच मिळाली. त्यानंतर तातडीने दोन्ही संघांना (दिल्ली आणि आंध्र प्रदेश) कळवण्यात आले आणि त्यांचे सराव सत्र देखील नवीन मैदानावर हलवण्यात आले.

बेंगळुरू हे विराट कोहलीचे आयपीएलमधील 'होम ग्राउंड' मानले जाते. तिथे त्याला खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी तयारी केली होती, मात्र सरकारच्या या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT