S Badrinath On Jasprit Bumrah : जगातील सर्वात भेदक गोलंदाज, अशी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची ओळख आहे. त्याच्या सारखा गोलंदाज संघाचा कणा ठरतो. म्हणूनच भारतीय संघ व्यवस्थापन बुमराहाला अत्यंत जपते, त्याच्यावर अति खेळाचा भार पडणार नाही, याची काळजीही घेते. मात्र टीम इंडियाचा माजी फलंदाज एस. बद्रिनाथ याने हे मत खोडून काढले आहे. त्याच्या मते टीम इंडियाकडे सध्या असा एक गोलंदाज आहे तो बुमराहपेक्षाही अधिक मौल्यवान आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेदरम्यान ३४ वर्षीय चक्रवर्तीने आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवली. त्याने सर्व पाच सामन्यांमध्ये सहभाग घेतला आणि तीन डावांत पाच बळी मिळवताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांना प्रभावीपणे रोखले. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत ब्रदीनाथने सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत जगात अव्वल स्थानी असलेल्या वरुण चक्रवर्तीचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्याने वरुण चक्रवर्तीला जसप्रीत बुमराहपेक्षाही अधिक मौल्यवान ठरवले आहे.
बद्रिनाथ म्हणाला, "आकडेवारी आपल्याला सांगते की वरुण चक्रवर्ती हा जगातील नंबर १ टी-२० गोलंदाज आहे. तो बुमराहपेक्षाही अधिक मौल्यवान आहे. पॉवरप्लेमध्ये किंवा मधल्या षटकांमध्ये किंवा अगदी १८ व्या षटकात धावांचा ओघ वाढत असतो, तेव्हा वरुण हाच गोलंदाज असतो. त्याने आपला खेळ एका वेगळ्याच स्तरावर नेला आहे. सुरुवातीला संधी मिळाल्यानंतर तंदुरुस्तीमुळे त्याला वगळण्यात आले; पण या दुसऱ्या टप्प्यात त्याने शानदार पुनरागमन करत आपल्या खेळाला एका नवीन उंचीवर नेले आहे."
चक्रवर्ती हा भारतीय संघासाठी एक मोठी संपत्ती आहे, किंबहुना एक शस्त्रच आहे. भविष्यात, भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने, तो सर्वात महत्त्वाचा घटक ठरेल. वरुणचा दिवस चांगला असल्यास, भारतीय संघाचा दिवस चांगला जाण्याची मोठी शक्यता असते, असेही ब्रदीनाथने यावेळी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चक्रवर्तीचा प्रवास २०२१ मध्ये भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणाने सुरू झाला. तथापि, टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये निराशाजनक कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते.आयपीएल २०२४ मधील प्रभावी कामगिरीनंतर गेल्या वर्षी त्याचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले. तेव्हापासून त्याने भारतासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. २०२४ मध्ये, त्याने सात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १७ बळी घेतले. त्याची ही फॉर्म २०२५ मध्येही कायम राहिली, जिथे त्याने १६ सामन्यांत २६ बळी मिळवले आहेत.नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताने २-१ ने विजय मिळवला, ज्याने संघात चक्रवर्तीचे स्थान आणखी मजबूत केले आहे. धावा रोखण्याची आणि महत्त्वपूर्ण बळी घेण्याची त्याची क्षमता यामुळे तो भारतीय क्रिकेट संघासाठी एक अमूल्य खेळाडू बनला आहे.