Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशीने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. १४ वर्षाच्या वैभवनं बुधावारी झालेल्या बिहारच्या हंगामातील पहिल्याच प्लेट ग्रुप सामन्यात देशांतर्गत क्रिकेटमधील आतापर्यंत सर्वात धडाकेबाज खेळी केली.
सूर्यवंशीने अरूणाचल प्रदेश विरूद्ध ८४ चेंडूत १९० धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने साकिबुल गनी सोबत सलामी दिली होती. या जोडीने अरूणाचल प्रदेशच्या गोलंदाजांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या खेळीत सूर्यवंशीनं १६ चौकार आणि १५ षटकार मारले. त्याचे वय पाहता ही खेळी वाखाण्याजोगी होती.
वैभव सूर्यवंशीनं या विक्रमी खेळीसोबतच एक जबरदस्त वर्ल्ड रेकॉर्ड केलं. लिस्ट A आणि टी क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी शतक ठोकणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिला पुरूष क्रिकेटपटू ठरला आहे. समस्तीपूरचा राहणारा वैभव हा यापूर्वी आयपीएल आणि टी २० क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला होता. बुधवारी त्यानं आपल्या विक्रमांच्या लीस्ट मध्ये अजून एक विश्वविक्रम समाविष्ट केला आहे.
वैभव सूर्यवंशीचे १४ वर्षे अन् २७२ दिवस इतके वय आहे. वैभव सूर्यवंशी हा लिस्ट A मध्ये शतक ठोकणारा सर्वात तरूण पुरूष क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने पाकिस्तानच्या जहूर इलाही यांचा अनेक दिवसांपासून अबाधित असलेला विक्रम मोडला. जहूर यांनी १५ वर्षे २०९ दिवस इतके वय असताना १०३ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यांनी ही खेळी १९८६ ला केली होती. विशेष म्हणजे सूर्यवंशीनं अरूणाचल प्रदेश विरूद्ध ३६ चेंडूत शतक ठोकलं होतं.
मात्र त्या दिवशी शाकिबुल गनीने ३२ चेंडूत तर इशान किशननं ३३ चेंडूत शतक ठोकलं. असं असलं तरी वैभव शतकानंतर शांत बसला नाही. त्यानं ५९ चेंडूत १५० धावांची खेळी केली अन् अजून एक रेकॉर्ड ब्रेक केलं. त्यानं एबी डिव्हिलियर्सचं लीस्ट ए मधील सामन्यात सर्वात वेगवान १५० धावा ठोकण्याचा विक्रम मोडला. डिव्हिलियर्सनं २०१५ ला वनडे वर्ल्डकपमध्ये ६४ चेंडूत दीडशतक ठोकलं होतं.
बिहारने अरूणाचल प्रदेश विरूद्धच्या वनडे सामन्यात तब्बल ५७४ धावांचा महापर्वत उभारला होता. त्यात वैभव सूर्यवंशीच्या १९० धावांचे मोठे योगदान होते.