

वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मधील आपला दमदार फॉर्म कायम ठेवला आहे. 'रायझिंग मेन्स स्टार्स एशिया कप' स्पर्धेत वैभवने संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध तुफानी शतक झळकावले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये वैभव बिहारचे प्रतिनिधित्व करतो.
एसीसी मेन्स एशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये भारत-अ संघाने आपला पहिला सामना संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध खेळला. १४ नोव्हेंबर (शुक्रवार) रोजी दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या 'ग्रुप-बी' च्या या सामन्यात भारत-अ संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय फलंदाजांनी कर्णधार जितेश शर्माचा निर्णय योग्य ठरवत सुरुवातीपासून धडाकेबाज फलंदाजी केली. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने पहिल्या चेंडूपासून युएईच्या गोलंदाजांना लक्ष्य केले. अवघ्या १४ वर्षांच्या वैभवने ३२ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले, ज्यात १० चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. शतक पूर्ण केल्यानंतरही वैभवने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्याने ४२ चेंडूंचा सामना करत १५ षटकार आणि ११ चौकारांची आतषबाजीने १४४ धावा फटकावल्या.
या दरम्यान, वैभवने नमन धीरसोबत दुसऱ्या विकेटसाठी केवळ ५६ चेंडूंमध्ये १६३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नमनने २२ चेंडूंवर ३४ धावांचे योगदान दिले, ज्यात तीन चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
आपल्या वादळी खेळीदरम्यान वैभव फक्त १७ चेंडूंवर ५० धावांच्या टप्प्यावर पोहोचला होता. वैभवला मुहम्मद फराजुद्दीनने अहमद तारिककरवी झेलबाद केले.
१. उर्विल पटेल २८ चेंडू : गुजरात विरुद्ध त्रिपुरा : इंदूर २०२४
२. अभिषेक शर्मा २८ चेंडू : पंजाब विरुद्ध मेघालय : सौराष्ट्र २०२४
३. ऋषभ पंत ३२ चेंडू : दिल्ली विरुद्ध हिमाचल प्रदेश : दिल्ली २०१८
४. वैभव सूर्यवंशी ३२ चेंडू : भारत-अ वि. यूएई : दोहा २०२५
एसीसी मेन्स एशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये या स्पर्धेत एकूण ८ संघ भाग घेत आहेत. भारत-अ संघास संयुक्त अरब अमिराती, ओमान आणि पाकिस्तान-अ सोबत 'ग्रुप-बी' मध्ये स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, 'ग्रुप-ए' मध्ये बांगलादेश-अ, हॉन्ग कॉंग, अफगाणिस्तान-अ आणि श्रीलंका-अ हे संघ आहेत. रविवार (१६ नोव्हेंबर) रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहाल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (यष्टिरक्षक/कर्णधार), रमनदीप सिंह, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकुर, गुरजपनीत सिंह आणि सुयश शर्मा.
अलीशान शराफू (कर्णधार), सैयद हैदर (यष्टिरक्षक), सोहैब खान, मयंक राजेश कुमार, हर्षित कौशिक, अयान अफजल खान, अहमद तारिक, मुहम्मद अरफान, मुहम्मद फराजुद्दीन, मुहम्मद रोहिद खान, मुहम्मद जवादुल्लाह.