Vaibhav Sooryavanshi Post pudhari
स्पोर्ट्स

Vaibhav Sooryavanshi Post: दोन शब्द, दोन इमोजी... सतत बेंचवर बसवल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीची सूचक पोस्ट व्हायरल

भारताच्या १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळालेली नाही. चौथ्या सामन्यात तरी त्याला खेळण्याची संधी मिळते का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Anirudha Sankpal

Vaibhav Sooryavanshi Post: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील चौथा टी २० सामना हा हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. आज (बुधवारी) होणाऱ्या सामन्यात भारत मालिका विजयासाठी जोर लावणार आहे. भारतने ५ सामन्यांच्या मालिकेतील २ सामने जिंकून २-१ अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत भारताच्या १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळालेली नाही. चौथ्या सामन्यात तरी त्याला खेळण्याची संधी मिळते का अशी चर्चा सुरू झाली आहे.

मालिका विजयासाठी प्रयत्न

मालिकेतील चौथ्या सामन्यात भारत वेस्ट इंडीजवर पुन्हा दबाव निर्माण करून मालिका जिंकण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजला मालिकेत बरोबरी साधण्याची ही शेवटची संधी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारताचा १५ वर्षाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

वैभवची सूचक पोस्ट

वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये खेळवण्यात का येत नाही, त्याला सतत बेंचवर का ठेवलं जातं यावरून सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्याच्या लहाणपणीच्या कोचने देखील टीकात्मक प्रतिक्रिया देत संघात हुकूमशाही सुरू आहे असं वाटतं असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता वैभव सूर्यवंशीने दोन शब्दांची प्रतिक्रिया दिली आहे.

वैभव सूर्यवंशीने काही फोटो शेअर करत बसून रहा असे कॅप्शन त्याला दिले आहे. तसेच वादळ आणि वेटिंगचा इमोजी शेअर केला आहे.

प्लेईंग ११ बदलण्याची नाही शक्यता

भारत मालिका विजयासाठी प्रयत्नशील असल्याने कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर आपली तिसऱ्या सामन्यातीलच प्लेईंग ११ कायम ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळं भारताची सलामी जोडी ही अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनच असण्याची दाट शक्यता आहे. चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा वैभवला बेंचवरच बसावं लागणार असं दिसतंय.

असं असलं तरी भारताचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरने वैभव सूर्यवंशीची पाठराखण केली आहे. त्याने १५ वर्षाच्या वैभवला वेस्ट इंडीजविरूद्धच्या पाचव्या टी २० सामन्यात भारताच्या प्लेईंग ११ मध्ये खेळवण्यात यावं असे मत व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT